शिर्डी Sai Baba Idol Deteriorating : जगभरातील भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरातील साई मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत आहे. या आधीही मूर्तीची झीज रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. आता अत्याधुनिक थ्रीडी स्कॅनिंग द्वारे मूर्तीचा डेटा संरक्षित करून पुढच्या पिढ्यांना आज दिसते तशी साई मूर्ती बघता येईल यासाठी प्रयत्न करण्याची चर्चा आहे.
मूर्ती इटालियन मार्बलची आहे : साई मंदिरातील सध्याची मूर्ती मुंबईचे शिल्पकार भाऊसाहेब उर्फ बाळाजी तालीम यांनी बनवलेली आहे. इटालियन मार्बलच्या या मूर्तीची 1954 मध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सुरवातीला या मूर्तीला दूध आणि पाण्यानं अंघोळ घातली जात असे. मात्र यामुळे मूर्तीची हळूहळू झिज होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर मूर्तीला दूधानं स्नान घालनं बंद करण्यात आलं, असं साई मंदिराचे पूर्वीचे पुजारी बाळकृष्ण जोशी सांगतात. सध्या साई संस्थाननं मूर्तीच्या स्रानासाठी अती गरम पाणी आणि दही-दुधाचा वापर नगण्य केला आहे.
मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग : मार्बल नैसर्गिकदृष्ट्या थंड असल्यानं गरम पाण्यामुळे तो ठिसूळ होतो. तसेच आम्लयुक्त दही-दूधाचा मूर्तीवर विपरीत परिणाम होतो. मूर्तीला रोज स्रान घालण्यास आणि टॉवेलनं पुसण्यास मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे माजी विश्वस्त पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी मनाई केली आहे. मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करून तिचा डेटा संरक्षित करता येतो. भविष्यात ही मूर्ती बदलायची असल्यास या डेटाचा वापर करून हुबेहूब आज दिसणारी मूर्ती बनवता येईल. त्यामुळे आता साई मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करावं का याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच सध्या आहे त्या मूर्तीची काळजी घेण्यासाठी साई संस्थाननं आवश्यक ती पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.
हे वाचलंत का :