बारामती (पुणे Sharad Pawar new )- राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून मोदी सरकारवर टीका केली. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले, "काँग्रेसचं बँक खाते गोठविण्यात आलं. त्यांच्या प्रचाराचं नियोजन थांबविलं. देशात कोणत्याच पक्षावर अशी कारवाई करण्यात आली नव्हती. काँग्रेसचं बँक खाते गोठविणं योग्य नाही. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे. धोरण करणाऱ्या राज्यांच्या प्रमुखांवर कारवाई करणं चुकीचं आहे. केजरीवाल यांना धोरण बनविण्याचा अधिकार आहे. केजरीवाल हे दिल्लीच्या सर्व जागा जिंकतील. केजरीवाल यांच्या अटकेचा मी निषेध करतो. आपच्या १०० टक्के जागा निवडून येणार आहेत."
ईडी आणि सीबीआयचा गैरवापर सुरू- शरद पवार यांनी केजरीवाल यांच्या अटकेबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, " यापूर्वी आदिवासींवर प्रभाव असलेल्या सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयचा गैरवापर सुरू आहे. राज्याच्या प्रमुख नेत्यांवर ईडीनं कारवाया केल्या आहेत. भाजपाला केजरीवाल यांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल. केजरीवाल दिल्लीत बसून पंतप्रधान मोदींना विरोध करतात. पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानंच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे."
लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू - पुढे शरद पवार म्हणाले, " निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल चिंता आहे. आणीबाणीतही झाले नव्हते, ते आता होत आहे. भाजपाकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. देशातील लोकशाहीवर संकट आहे. सत्तेचा गैरवापर सुरू आहे. माढाची जागा रासपला द्यावी, अशी इच्छा आहे. त्यासाठी आम्ही चर्चा करणार आहोत. सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहोत. मी कुठूनही लढणार नाही अथवा निवडणुकीला उभा राहणार नाही. चांगले काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं आहे."
हेही वाचा-