अमरावती Educational Kit To Students : शासनाच्या वतीनं शाळेचा गणवेश मिळतो, अभ्यासक्रमाची सर्व पुस्तक देखील मिळतात. मात्र, वही, पेन, पेन्सिल असे वर्षभर लागणारे साहित्य मेळघाटच्या जंगलातील दुर्गम भागात वसलेल्या गावातील चिमुकल्यांना मिळणं फार कठीण आहे. या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नसल्यामुळं शिक्षणात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं एकूण 14 शाळांमधील चिमुकल्यांना वर्षभर पुरेल असं शालेय साहित्य वितरित करण्यात आलय. सलग तीन दिवस हा उपक्रम राबविण्यात आला.
तीन वर्षांपासून केली जात आहे मदत : अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं गत तीन वर्षांपासून मेळघाटातील दुर्गम भागात वसलेल्या एकूण पंधरा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केलं जातं. चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या सलोना सर्कल अंतर्गत सलोना, कोहना, भूलोरी, हत्तीघाट, मसुंडी ,बिहाली, जैतादेही, भादरी, बेला, लवादा, गटांग, जामली, ढोमणीफाटा आणि भवई या अतिशय दुर्गम भागात वसलेल्या गावातील शाळांपर्यंत पोहोचून तिथं शिकणाऱ्या आदिवासी चिमुकल्यांना शालेय साहित्याचं वितरण शुक्रवार ते रविवार असं सलग तीन दिवस करण्यात आलं.
1063 मुलांना लाभ : मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या अनेक गावात साधं किराणा दुकान सापडणं देखील कठीण आहे. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे वही, पेन, चित्रकलेची वही आदी साहित्य उपलब्ध होणं कठीणच. आई वडील एखाद्या वेळेस परतवाडा, चिखलदरा किंवा धारणी या तालुक्याच्या ठिकाणी गेले तरच असं शालेय साहित्य चिमुकल्यांसाठी खरेदी करून आणू शकतात. असं जरी असलं तरी दुर्गम भागात असलेल्या अनेक गावातील ग्रामस्थ हे अनेकदा वर्षानुवर्ष तालुक्याच्या ठिकाणी देखील जात नाही अशी परिस्थिती आहे. एकूणच या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावं या उद्देशानं गत तीन वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत, अशी माहिती सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैभव वानखडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. यावर्षी मेळघाटात दुर्गम भागात वसलेल्या 14 गावांमधील एकूण 1063 चिमुकल्यांना आम्ही शालेय साहित्य वितरित केलं असल्याचंही वैभव वानखडे यांनी सांगितलं.
प्रत्येक शाळेत स्वागत : अकोल्याच्या सेवा बहुउद्देशीय संस्थेला त्यांनी दत्तक घेतलेल्या सर्व 14 शाळांमध्ये पोहोचणं अतिशय कठीण बाब होती. यामुळं काही ठराविक गावांमधील शाळांमध्ये अतिशय दुर्गम भागातील शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना बोलावून त्यांच्याकडं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य सोपविण्यात आलं. विशेष म्हणजे ज्या शाळांमध्ये सेवा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोहोचले, त्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचं आदिवासी नृत्य सादर करून स्वागत केलं. आपल्याला वही, पेन, रंगकांड्या, चित्रकलेची वही मिळणार याचा आनंद चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर देखील झळकत होता.
शिक्षकांमध्येही उत्साह : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची पूर्णतः जाण आहे. अशा परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक साहित्य हे वर्षभर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार असल्यामुळं सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. गत तीन वर्षांपासून अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्यामुळं नुसता फायदाच होत नाही तर त्यांच्या गुणवत्तेत देखील सुधारणा होत असल्याची प्रतिक्रिया घटांग येथील शिक्षक वैजनाथ इप्पर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. तसंच आमच्या सलोना सर्कलमध्ये येणाऱ्या सर्व शाळांमधील चिमुकल्यांना ही मदत मिळत असल्यामुळं आम्हा शिक्षकांना देखील याचा फायदा होत असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा -