मुंबई : बीडमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण करुन खून करण्यात आला. तर पुण्यात भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करुन खून करण्यात आला. खासदार फोन करत असताना बीडचे पोलीस अधीक्षक फोन उचलत नाहीत, देवेंद्र फडणवीस यांना असं राज्य चालवायचं का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
कायदा सुव्यवस्थेवरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांचा अपहरण करुन खून करण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून जमावानं रोडवर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केलं. याबाबत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की "बीड आणि पुण्यात अपहरण करुन खून करण्यात आला आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांना खासदारानं फोन केल्यानंतर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पुण्यात तर भाजपा आमदारांच्या मामाचं अपहरण करुन खून करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पार ढेपाळली आहे. देवेंद्र फडणवीस यांना असा राज्यकारभार करायचा आहे का," असं सवाल संजय राऊत यांनी यावेळी विचारला.
शरद पवारांवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मारकरवाडी इथं भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आला, अशी टीका त्यांनी केली. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. "शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी देशात अनेक विकासकामं करुन राजकारणाचा पाठ शिकवला. त्यामुळे त्यांच्यावर बोलताना भान ठेवलं पाहिजे. मात्र गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका ही देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का, देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोललं पाहिजे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- इंडिया आघाडीत मतभेद! राहुल गांधींबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
- बांगलादेशात मंदिरांसह हिंदूंवर हल्ले ; पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांना हिंदू केवळ मतांसाठी हवाय, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा
- 'महाराष्ट्र गुजरात भाऊ भाऊ, मात्र केंद्रातील नेत्यांनी नातं खराब केलं'; आता महाराष्ट्राचं पुढं काय होईल, संजय राऊतांचा सवाल