मुंबई Sameer Wankhede News : अंमलबजावणी संचालनालयाने माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नव्याने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळं समीर वानखेडेंवर अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी अंतरिम स्थगिती मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची सुनावणी मंगळवारी (13 फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर पार पडली. यावेळी ईडी वतीनं 'समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण मागायचं असेल तर त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडं जावं लागेल', असं सांगण्यात आलं.
काय आहे प्रकरण : मागील आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयानं मुंबई येथे सीबीआयनं दाखल केलेला गुन्ह्याच्या आधारे ईडीनं दिल्लीमध्ये गुन्हा वर्ग केला. ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबई ते गोवा कार्डेलिया क्रूज प्रकरणात अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपये लाच आणि खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्याप्रकरणीच नवा गुन्हा अंमलबजावणी संचालनालयानं दिल्ली येथे दाखल केलेला होता.
अटकेच्या कारवाईपासून संरक्षण मिळू शकत नाही : ईडीचा गुन्हा दिल्लीमध्ये वर्ग करण्यात आल्यामुळं दिल्ली उच्च न्यायालयाकडं दाद मागण्याशिवाय तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पर्याय नाही. त्याशिवाय त्यांना अटकेच्या कारवाईपासून संरक्षण मिळू शकत नाही. सीबीआयकडून गेल्यावर्षी या संदर्भात जो गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या आधारे ईडीनं मनी लॉंन्ड्रीग बद्दलचा गुन्हा समीर वानखडे यांच्या विरोधात नोंदवला होता. परंतु मुंबईतील दाखल गुन्हा ईडीनं दिल्लीमध्ये वर्ग केला. त्यामुळंच आता या खटल्याला नवीन वळण मिळालं आहे.
पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला : दहा दिवसांपूर्वीच दिल्ली येथील पटियाला न्यायालयासमोर समीर वानखेडे यांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याची दखल न्यायालयानं घेतली असून त्याप्रकरणी तपासंत्रणांकडून कारवाई सुरू आहे, असं वानखेडे यांच्या वकिलांनी सांगितलं. परंतु ईडीकडून समीर वानखेडे यांच्या मुद्द्यालाला जोरदार विरोध करण्यात आला. 'दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवला आहे, तर दिल्लीमध्येच याबाबत न्याय मागावा' असं ईडीनं म्हटलंय. त्यामुळं न्यायालयानं ही सुनावणी तहकूब केली असून पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
हेही वाचा -