नाशिक Salim Kutta Party : मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेत डान्स पार्टी प्रकरणात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता भाजपाचा पदाधिकारी आणि सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेत 2016 च्या मे महिन्यात सुधाकर बडगुजर यांच्या आडगाव हद्दीतील हिंदुस्तान नगरमधील फार्म हाऊसवर पार्टी करण्यात आली होती.
आमदार नितेश राणेंनी हिवाळी अधिवेशनात पुढं आणला व्हिडिओ : या पार्टीमध्ये सलीम कुत्ता, सुधाकर बडगुजर यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी दाखवून कारवाईची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेनं या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तसंच भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांच्यावरही बेकायदेशीर कृत्य केल्याच्या कलमान्वये आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
19 साक्षीदार तपासले : सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या पार्टीमधील 19 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. यात काही गोपनीय साक्षीदारांचा समावेश होता. साक्षीदारांच्या जबाबात बरेच खुलासे समोर आले आहेत. या अनुषंगानं चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सागितलं.
गुन्हा दाखल झाला तर न्यायालयात जाईल : "सलीम कुत्ता व्हिडिओ प्रकरण असो की, एसीबीच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार हा केवळ राजकीय हेतूनं प्रेरित आहे. 8 वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करण्यात आलीय. तिथं असणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. मी फक्त तिथं 5 मिनिटं होतो, त्यामुळं तिथं असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे. खासदारांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. गुन्हा दाखल झाला असेल तर न्यायालयात जाईल. उद्धव ठाकरे माझ्यासोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज चाललो आहे," असा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी केलाय.
हेही वाचा :