नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. "लोकसंख्या शास्त्र सांगतो की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. त्यामुळं दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत," असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना त्यांनी हे विधान केलं.
एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही : कठाळे कुल संमेलनात मोहन भागवत यांच्याआधी काही व्यक्तींनी सध्या अनेक तरुण जोडपे एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असा उल्लेख करत चिंता व्यक्त केली. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर दिलं.
लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला तर...: "सध्याची लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगतो की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो. तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले," असं म्हणत मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली.
दोन पेक्षा जास्त अपत्य पाहिजे : "आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष 2000 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असंच सांगितलं आहे की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये. मग जर 2.1 एवढा लोकसंख्या वाढीचा दर पाहिजे असेल तर प्रत्येक जोडप्याला दोन पेक्षा जास्त अपत्य पाहिजेत, कमीत कमी तीन अपत्य पाहिजेच. देशाच्या भविष्यासाठी योग्य लोकसंख्या वाढीचा दर राखणं महत्त्वाचं आहे," असं मोहन भागवत म्हणाले.
हेही वाचा