मुंबई : Rohit Pawar ED Investigation : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज बुधवारी ईडीकडून चौकशी झाली. यावेळी राष्ट्रवादीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. आमदार रोहित पवार यांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत असं सांगण्यात आलं होतं. खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला आल्या. तर रोहित पवार बाहेर आल्यानंतर रात्री सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर होत्या.
यावेळी ईडी कार्यालयाबाहेर उभे असलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचे रोहित पवार यांनी आभार मानले. यावेळी शरद पवार हे बाप माणूस म्हणून त्यांच्याबरोबर १२ तास कार्यालयात उपस्थित होते, असं रोहित पवार यांनी सांगितलं. तसंच पवार साहेबांना लढणारी माणसं आवडतात असं सांगून रोहित पवार यांनी युवकांना संघर्षाची तयारी आहे का असा प्रश्न विचारुन त्यांचा पाठिंबा असल्याची खात्री करुन घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी फोन करुन चौैकसी केल्याचं तसंच पाठिंबा दिल्याची माहितीही यावेळी पवार यांनी दिली. तसंच ईडी कार्यालयाबाहेरही या सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दरम्यान खिचडी घोटाळा प्रकरणी खा. संजय राऊत यांचे बंधु संदीप राऊत यांना ईडीनं समन्स दिल्याचं वृत्तही येत आहे.
Live Updates-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आम्ही काही चूक केली नाही. त्यामुळे चौकशीच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही. ईडीची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे. रोहितची बाजू ऐकली जाईल, असा विश्वास आहे. सर्व एजन्सींना पूर्णपणे सहकार्य करत आहोत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही."
- रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
- शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन रोहित पवार हे ईडीच्या चौकशीसाठी रवाना झाले आहेत. शरद पवार यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक यावेळी भेट दिले. ईडी चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, चुकीच्या व्यक्तीवर ईडीचा प्रयोग आहे.
- ईडीच्या समन्सवर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार पवार म्हणाले, "मी एजन्सीनं मागवलेल्या सर्व फाईल्स आणि कागदपत्रे घेऊन जात आहे. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. ईडीचे अधिकारी फक्त त्यांचे काम करत आहेत. माझ्याकडे त्यांच्या विरोधात काहीही नाही. माझ्यावर दबाव टाकण्यासाठी हे सर्व केले जात आहे. मी कोणाला घाबरत नाही.
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे मुंबईतील पक्ष कार्यालयात आगमन झाले.
- राष्ट्रवादी-शरद पवार गटातील कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते रोहित पवार यांचे समर्थक मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर जमले.
यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न : रोहित पवारांच्या घरी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची छापेमारी सुरू होती. मात्र, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. तसंच, ''मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू आहे'' असं रोहित पवारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बारामती अॅग्रोवर छापेमारी : ईडीनं बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी कोली होती. आमदार पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. आता ईडीनं पुन्हा आपला मोर्चा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोकडे वळवला आहे.
महाविकास आघाडीचे नेत्यांमागे ईडीचा फेरा : गेली अनेक दिवसांपासून ईडीकडून फक्त चौकशीच सुरू आहेत. सध्याचा आठवडा हा विरोधी पक्षातील नेत्यांच्या 'चौकशांचा आठवडा' आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. कथित बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आली. त्यानंतर मंगळवारी ठाकरे गटाचे आमदार रवींग्र वायकर यांनाही 11 वाजता ईडीनं चौकशीसाठी समन्स धाडलं आहे. जोगेश्वरीतील भूखंडप्रकरणी वायकरांची चौकशी सुरू आहे. तर, आज आमदार रोहित पवार यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. गुरुवारी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं चौकशीसाठी पाचारण केलं आहे. कोरोना काळातील कथित बॉडीबॅग प्रकरणाची चौकशी होणार आहे.
हेही वाचा :
1 रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने कार्यकर्ते आक्रमक; कार्यालयाबाहेर करणार ठिय्या आंदोलन
2 रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या, बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी