कोल्हापूर Ramoji Rao Passed Away : देशातील सर्वात मोठे प्रादेशिक वृत्तपत्र ईनाडूचे मालक, रामोजी फिल्म सिटी आणि ई टीव्ही वृत्त समूहाचे संस्थापक रामोजी राव यांचं आज वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरात चित्रपट सृष्टीचा चालता-बोलता इतिहास अर्थात जयप्रभा स्टुडिओला 90 च्या दशकात रामोजी राव यांनी भेट दिली होती. यावेळी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याशी जयप्रभा स्टुडिओ विकसित करण्यावर चर्चा झाली होती. पहिल्यांदाच रामोजी फिल्म सिटी सोडून कोल्हापूरच्या मातीत ईटीव्ही मराठी वाहिनीवरील दौलत या मालिकेच्या शुभारंभालाही रामोजी राव उपस्थित होते. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीबद्दल रामोजी राव यांना विशेष आदर होता. त्यांच्या निधनानं देशातील पत्रकारिता आणि चित्रपटसृष्टीची जाण असणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना कोल्हापुरात व्यक्त झाल्या आहेत.
चित्रपटसृष्टीला चालना देण्याचं काम : कलापूर अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात मराठी चित्रपट सृष्टीचा पाया रोवला गेला. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीतून साकारलेल्या जयप्रभा स्टुडिओची भुरळ रामोजी राव यांनाही पडली होती. ईटीव्ही मराठी या वाहिनीवरील कुलदीप यादव, प्रतीक्षा लोणकर यांच्या प्रमुख भूमिकेतील दौलत या मराठी मालिकेची 2000 मध्ये कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओतून सुरुवात करण्यात आली होती. यावेळी मालिकेच्या चित्रीकरणाचा शुभारंभ रामोजी राव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. यावेळी अंगावर पांढराशुभ्र सदरा, पांढरी पँट अशा पेहरावात कोल्हापूरकरांनी रामोजी राव यांचं व्यक्तिमत्व डोळ्यात साठवलं होतं. चित्रपट निर्मिती क्षेत्रात आशिया खंडातील सर्वात मोठा चित्रीकरणाचा स्टुडिओ उभा करुन रामोजी राव यांनी चित्रपटसृष्टीलाही चालना देण्याचं काम केलं अशी आठवण कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितली.
कोल्हापुरात चित्रीकरणाला पसंती : हैदराबाद बाहेर मराठी मालिकेच्या चित्रिकरणासाठी रामोजी राव यांनी कोल्हापूरला पसंती दिली होती. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ, लोहिया बंगला, किशाचा मळा या ठिकाणी ईटीव्ही मराठी वरील दौलत या पहिल्या मालिकेचं चित्रिकरण मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपट आणि मालिका कलाकारांच्या उपस्थितीत झाल्याची आठवण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह मिलिंद अष्टेकर यांनी सांगितली. कोल्हापूर सारख्या ग्रामीण असलेल्या ठिकाणी येऊन चित्रपट निर्मितीचा इतिहास समजावून घेताना रामोजी राव यांनी त्यावेळी काही तंत्रज्ञ या ठिकाणी शिकण्यासाठी पाठवले होते. याचाही रामोजी फिल्म सिटी उभारताना त्यांना फायदा झाल्याचं अष्टेकर म्हणाले. कोल्हापूरकरांच्या वतीनं जड अंतकरणानं अष्टेकर यांनी माध्यम सम्राट रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा :