मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी लाडकी बहीण योजना, विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून महायुतीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले, "महाविकास आघाडीनं 288 जागांवर अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडी एकदिलानं आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे. महाविकास आघाडीतील काही जागांवर बंडखोरी झाली आहे. त्याठिकाणी बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील". आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा दावा चेन्नीथला यांनी केला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या प्रचार गीताचे अनावरण करण्यात आले.
- काँग्रेसचे अध्यक्ष मल्ल्किा खरगे आणि राहुल गांधी ६ नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. मुंबईतील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे हे यावेळी उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले.
रमेश चेन्निथला म्हणाले, "महायुतीमध्ये अंतर्गत वादविवाद मोठ्या प्रमाणात आहेत. शिवसेनेतून भाजपाचे उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. तर भाजपाचे उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. महायुतीमध्ये सर्वाधिक जागांवर भाजपाच लढत आहे. भाजपाकडून महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला संपवण्यात आले आहे. महायुती विचित्र गठबंधन आहे." आपण इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असा प्रकार प्रथमच पाहत असल्याचा दावा त्यांनी केला.
महाविकास आघाडीत सर्व घटक पक्षांना योग्य ते महत्त्व देण्यात आले. सर्व पक्षांना समान वागणूक देण्यात आली. मात्र, महायुतीत भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा चोरल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाने मित्रपक्षांना संपवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे- महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला
कुठेही मैत्रीपूर्ण लढाई नाही-"महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढाई होणार नाही. बंडखोरी झालेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्यात येईल असे ते म्हणाले. बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, वर्षा गायकवाड आणि नाना पटोले हे एकत्र बसून बंडखोरांना अर्ज माघार घेण्याबाबत चर्चा करतील. पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यांनाच एबी फॉर्म देण्यात आले," अशी माहिती चेन्नीथला यांनी दिली.
लाडकी बहीण योजना बंद पडणार-महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणाले, "लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडं निधी नाही. त्यामुळेच भारतीय निवडणूक आयोगानं ही योजना थांबविली आहे. महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाहीत. महिलांना सरकारकडून एकही पैसा मिळणार नाही. निवडणुकीपूर्वी सर्व खोटे बोलण्यात आले आहेत. "
हेही वाचा-