सातारा Devendra Fadnavis On Rajya Sabha Seat : निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील २ जागांसह राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसलेंच्या माध्यमातून प्रथमच भाजपाचा खासदार निवडून आला. तर आता त्यांची राज्यसभेची रिक्त झालेली जागा अजित पवार गटाला मिळेल, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना दिलीय.
राजधानीत भाजपाला स्वतःचं घर मिळालं : साताऱ्यातील खेड गावच्या हद्दीत भाजपा पक्ष कार्यालयाच्या नियोजित इमारतीच्या भूमीपूजनप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजपाला सातारा जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून स्वराज्याच्या राजधानीत स्वतःचं घर मिळत आहे. पक्षाचं कार्यालय किती प्रशस्त, भव्य आहे. यापेक्षा ते किती लोकाभिमुख आणि जनतेला न्याय देणारं आहे, हे अधिक महत्त्वाचं असतं", असं फडणवीस म्हणाले.
फाईव्हस्टार व्यापारी संकुलास शासनाकडून मदत करणार : "सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उभारण्यात येत असलेल्या फाईव्हस्टार व्यापारी संकुलामुळे कै. अभयसिंहराजे भोसले यांची स्वप्नपुर्ती होणार आहे. संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल आणि ग्राहकांना शेतमाल साठवणुकीसह सर्व सुविधा मिळणार आहेत. संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल," अशी ग्वाही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांचं बलिदान : "माथाडी नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वात पहिलं बलिदान दिलं. त्यांच्या नावाचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुनरुज्जीवित केलं. त्याची जबाबदारी सोपविल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी गावोगाव फिरुन मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवल्याचं आहे," देवेंद्र फडणवीस म्हणाले. "आजवर साडेआठ हजार कोटींचं कर्ज वितरीत केलंय. या महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख उद्योजक तयार झाले. आता 5 लाख उद्योजक तयार करण्याचा दूसरा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -