पुणे Pune Porsche Crash Case : कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली. आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. संशयित अल्पवयीन आरोपीसोबतच आणखी दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताची अदलाबदल करण्यात आली होती.
आणखी दोघांना अटक : रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांना काल (19 ऑगस्ट) रात्री पुणे गुन्हे शाखेनं अटक केली. अपघातावेळी कारमध्ये उपस्थित असलेल्या मुख्य अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात त्यांचा (अटक केलेले) सहभाग असल्याचा आरोप आहे. पुढील तपास सुरू आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहातून मुक्त : पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुधारगृहातून मुक्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिले होते. अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. त्यानंतर 25 जून रोजी अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून मुक्त करण्यात आले.
प्रकरणाचा घटनाक्रम : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 18 मे रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगानं धावणाऱ्या आलिशान पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिल्यानं तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. अटक केल्याच्या काही तासातच केवळ एक निबंध लिहून घेत मुलाला जामीन मिळाला होता. त्यावरुनही राजकारण तापलं होतं. घटनेच्या काही दिवसांनी प्रकरणानं वेगळं वळण घेतलं. संशयित आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची फेरफार झाल्याचं समोर आलं. यात मुलाच्या आईचा आणि बहिणीचा सहभाग असल्याचा आरोप होता. त्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली होती.