पुणे - pune hit and run case: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं आहे की, या प्रकरणात ते कोणालाही सोडणार नाहीत. मात्र, गृहमंत्री यांनी या प्रकरणात जे काही खरं असेल ते सांगावं, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त सारसबाग येथील अभिवादन कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात महाराष्ट्र शासनाचं प्रत्येक डिपार्टमेंट काही ना काही वेगळी माहिती देत आहे. यामुळे देवेंद्रजी यांनी पारदर्शकपणे यात जे काही खरं असेल ते समोर आणलं पाहिजे.
हे या सरकारचं अपयश : पुणे शहरातील हिंजवडी येथील काही कंपन्या आता राज्याच्या बाहेर जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मूलभूत सुविधा या संदर्भात मी अनेक प्रयत्न केले पण सरकार गंभीर नाही. फक्त घरं, पक्ष फोडण्यात हे सरकार गुंतलं आहे. राज्यात भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळाचं संकट कोसळलं आहे. पुण्यात ड्रग्स माफिया आणि होणारे खून हे या सरकारचं अपयश आहे. अशी टीका त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नार्को टेस्ट बाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, अंजली दमानिया आणि अजित पवार त्या दोघांचा हा अंतर्गत प्रश्न आहे.
काही लोकांमुळं रूग्णालयाचं नाव खराब: ससून रुग्णालय बाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, ससून राज्यातील एक चांगलं रुग्णालय आहे. ससून रुग्णालयचे व्हाईट पेपर काढा म्हणजे सगळं खरं समोर येईल. सरकारनं गलिच्छ राजकारण बाजूला ठेऊन त्या २ मृत्युमुखी पडलेल्या तरुणांना न्याय दिला पाहिजे. ससून हॉस्पिटल हे चांगले असून फक्त काही लोकांमुळे नाव खराब होत आहे. असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. मंत्री छगन भुजबळ हे नाराज असून ते पुन्हा पक्षात येणार असल्याची चर्चा आहे, यावर सुप्रिया म्हणाल्या की भुजबळ नाराज आहेत? मला कानावर काही आलं नाही. त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. सोनिया दुहान यांनी जे आरोप केले आहे, त्याबाबत सुळे यांना विचारलं असता त्यांनी भाष्य केलं की, लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे आणि तिला तर तो हक्क आहेच, असा टोला यावेळी सुळे यांनी लगावला.
हेही वाचा