पुणे Pune Drug Case : पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर आता पुणे अंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीनं उडी घेतली आहे. पुणे पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची ईडीनं माहिती मागवली आहे. ड्रग्ज प्रकरणातील ज्या आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे, त्या आरोपींच्या मालमत्तेची ईडीनं पुणे पोलिसांकडून माहिती मागवली. तसं पत्र पोलिसांना ईडीनं पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडं पुणे पोलिसांनी मास्टरमाईंड संदीप धुणे याच्या प्रेयसीची चौकशी केली आहे. संदीप धुणेची प्रेयसी ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे.
आतापर्यंत 11 आरोपींना ठोकल्या बेड्या : पुणे ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपींच्या मालमत्तेचा तपास करायला सुरुवात केली. आतापर्यंत पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात 11 आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली आहे. आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
आतापर्यंत 3600 कोटी रुपयांचं पकडलं ड्रग्ज : पोलिसांनी पुणे, दिल्ली आणि सांगली इथं कारवाई करत जवळपास 3600 कोटी रुपयांचं 1800 किलो ड्रग्ज पकडलं आहे. ड्रग्जमुक्त पुणे हे अभियान पुणे पोलिसांनी हाती घेतलं. 500 ग्रॅमवरून सुरू झालेली कारवाई पुणे, दिली आणि सांगली इथंपर्यंत पोहोचत जवळपास 3600 हून अधिक कोटी रुपयांचं मेफेड्रोन (एमडी ) जप्त करण्यात आल. पुणे पोलिसांकडून दिल्ली येथे जी कारवाई करण्यात आली त्यात 970 किलो एमडी जप्त करण्यात आलं आहे. तर पुणे आणि सांगली येथे कारवाई करत 830 किलो एमडी जप्त करण्यात आलं. आता या प्रकरणी पुणे पोलिसांना ईडीनं नोटीस पाठवून आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे.
संदीप धुणेच्या प्रेयसीचा ड्रग्ज तस्करीत सहभागाची शक्यता : पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मास्टरमाईंड संदीप धुणेच्या प्रेयसीचा ड्रग्ज तस्करी प्रकरणात समावेश असल्याचं सांगितलं जातं आहे. मास्टरमाईंड संदीप धुणेची प्रेयसी सोनम पंडितची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे. सोनम पंडित हिला पुणे पोलिसांनी बिहारमधील पूर्णियात जाऊन नोटीस बजावली होती. संदीपने सोनमच्या नावानं काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय होता. तसेच संदीप आणि सोनम यांनी पुण्यात भाडेतत्त्वावर एक फ्लॅट देखील घेतला होता. ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुणे हा नेपाळमार्गे कुवैतला पसार झाल्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात सोनमनं काय केलं? कोणाला मदत केली, याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :