पुणे- पोर्श कार अपघातामधील अल्पवयीन मुलाची जामिनवर सुटका करण्यात आलेल्या बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्यांची (JJB) चौकशी होणार आहे. ही चौकशी करण्याकरिता महिला आणि बाल विकास विभागाकडून (WCD) पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी करण्याकरिता समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष हे उपायुक्त दर्जाचे असणार आहेत. समितीचे अध्यक्ष पुढीलआठवड्यात अहवाल सादर करणार आहेत. पुणे कार अपघात प्रकरणात आदेश जारी करताना नियमांचे पालन करण्यात आले का? हे समिती तपासणार आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी पहाटे 17 वर्षीय मुलानं भरधाव वेगानं पोर्श चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात तरुण-तरुणी ठार झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला बालहक्क न्याय मंडळानं जामिन मंजूर केला. जामिन मंजूर करताना अल्पवयीन मुलाला रस्ते अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगण्यात आलं. त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. महिला आणि बालकल्याण आयुक्त प्रशांत नरनावरे म्हणाले, बालहक्क न्याय मंडळात न्यायव्यवस्थेमधील एक सदस्य आहेत. तर राज्य सरकारनं नियुक्त केलेले दोन सदस्य आहेत.
सदस्यांच्या वर्तनाची चौकशी होणार- आयएएस अधिकारी प्रशांत नरनावरे म्हणाले, "आम्ही बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करणार आहोत. बालहक्क न्याय कायद्यांतर्गत राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या सदस्यांची चौकशी करण्यात अधिकार आहेत. अल्पवयीन मुलाला जामिन मिळाल्यानंतर आम्ही त्वरित चौकशी समिती नेमली होती."
- अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणाचीही तीन सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.