पुणे Plastic Bottle house : पर्यावरणासाठी प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बाटल्या किती घातक आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरीही त्याचा वापर काही कमी होत नाही. दिवसभरात पाण्याच्या, कोल्ड्रिंक्सच्या हजारो बॉटल्स कचऱ्यात जमा होतात. याच बॉटल्सचा अतिशय देखणा प्रयोग पुण्यातील आर्किटेक्ट राजेंद्र इनामदार यांनी केलाय. ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स आपण फेकून देतो, त्याच प्लास्टिकच्या बॉटल्सचा उपयोग करत त्यांनी दहा गुंठ्यांमध्ये अतिशय सुंदर असं घर बांधलं आहे.
85 हजार बॉटल्सचा वापर : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरा गावात इनामदार यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर साकारलंय. विशेष म्हणजे घराच्या भिंती विटांऐवजी चक्क कचऱ्यात फेकून दिलेल्या पाण्याच्या बॉटल्सपासून उभारल्या आहेत. त्यासाठी 85 हजार बॉटल्सचा वापर करण्यात आला. 'प्लॅस्टिक रिसायकल' ही संकल्पना डोक्यात ठेवून सिंहगडावरून तसेच इतरत्र कचराकुंडीत टाकून दिलेल्या बॉटल्स त्यांनी गोळा केल्या आणि स्वप्नात बघू तसं घर प्रत्यक्षात साकारलं.
याबाबत बोलताना राजेंद्र इनामदार यांनी सांगितल, "प्लास्टिकच्या बाबतीत सरकारनं ठोस पावलं उचलावी, असा सतत विचार येत होता. एके दिवशी रात्री झोपेत असताना माझ्या मनात एक कल्पना आली की, प्लास्टिकच्या बॉटल्स ज्या रस्त्याच्या आजूबाजूला पडून असतात अशा बॉटल्सचा उपयोग करून घर बनवावं. सकाळी उठल्या उठल्या याबाबत विचार करायला सुरुवात केली. खरोखरच प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर घर बांधणीसाठी करता येईल का? असा विचार करत-करत दोन ते तीन वर्षानंतर 2017 साली दहा हजार स्केअर फुटच्या प्लॉटमध्ये विटांच्या ऐवजी प्लास्टिकच्या बॉटल्स वापरायला सुरुवात केली."
सिमेंट आणि कच टाकून घर बांधायला सुरूवात : "खडकवासला येथील चौपाटी तसंच सिंहगड किल्ल्यावर लोकांनी फेकलेल्या बॉटल्स जमा करायचो. या बॉटल्स शोधत त्यात सिमेंट आणि कच टाकून घर बांधायला सुरूवात केली. त्यावेळी भिंतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या एका विटेची किंमत सात ते आठ रुपये होती. जर बॉटल्सचा वापर केला तर हीच किंमत साडेतीन ते चार रुपयांपर्यंत पडत होती. बॉटल तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक जर जमिनीत पुरलं तर त्याला 'डी-कंपोज' होण्यासाठी साडेचारशे ते हजार वर्षे इतका कालावधी लागतो. अशा प्रकारे घरासाठी बॉटल्सचा वापर केल्यानं पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत देखील होईल आणि विटांपेक्षा जास्त याची लाईफ असेल, याचा देखील विचार करत मी माझ्या प्लॉटवर तब्बल 85 हजार प्लास्टिकच्या बॉटल वापरून घर बनवलं." असं इनामदार यांनी सांगितल.
बांधकामासाठी एक लिटरच्या बॉटल्सचा वापर : "सुरुवातीला छोट्या प्रमाणात म्हणजेच फक्त कुत्र्यांसाठीच खोल्या बनवायचा विचार होता, मात्र हा विचार पुढे जात जात आज दहा गुंठ्याच्या जागेत घर बांधलं. एक लिटरच्या बॉटल्स संपूर्ण बांधकामासाठी वापरण्यात आल्या आहे. आज विशेष म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याशी हे घर असल्यानं पर्यटक या घरात राहण्यासाठी देखील येतात आणि ते देखील कौतुक करतात." असं इनामदार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
हेही वाचा