नागपूर Vinay Punekar Murder Case : फोटोग्राफर विनय पुणेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला नागपूर पोलिसांना तब्बल ४ महिन्यांनंतर अखेर अटक केली आहे. हेमंत रामनरेश शुक्ला असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो गेल्या ४ महिन्यांपासून स्वतःचा वेश बदलून देशाच्या इतर भागांत वावरत होता. नागपूरच्या सदर पोलिसांनी (Nagpur Police) तंत्रज्ञान आणि बुद्धी कौशल्याचा वापर करत आरोपीला पंजाब राज्यातील लुधियाना येथून अटक केलीय.
गळ्यावर झाडली गोळी : विनय पुणेकर हे त्यांच्या घरी एकटेचं राहायचे. २४ फेब्रुवारी रोजी एक आरोपी त्यांच्या घरात शिरला आणि त्या आरोपीनं विनय यांच्या गळ्यावर गोळी झाडली. त्यामुळं विनय यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. विनय पुणेकर यांची हत्या कोणी आणि कश्यासाठी केली याबाबत तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी विनय यांच्या मोबाईलवर आलेल्या कॉल्सचे डिटेल तपासले असता, तेव्हा एका महिलेशी वारंवार संभाषण झाल्याचं स्पष्ट झालंय.
विनय पुणेकरच्या मैत्रिणीची हालचाल संशयास्पद : २४ फेब्रुवारीला ५२ वर्षीय विनय सॅम्युअल पुणेकर यांची राजनगर येथील निवासस्थानी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी सदर पोलीसांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवली. त्या दरम्यान मृतकाचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला होता. मोबाईल फोनची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या आजुबाजुचा परिसर आणि नागपूर शहरातील अनेक कॅमेरे पिंजुन काढल्यानंतर एक महिला आणि एक इसमाची हालचाली पोलिसांना संशयित आढळून आल्या होत्या.
साक्षीच्या मदतीनं हेमंत शुक्लाने रचला कट : विनय पुणेकर हत्या प्रकरणात साक्षी मोहित ग्रोवर नामक महिलेचं नाव पुढे आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी साक्षीची सखोल विचारपूस केली. तिनं तिचा परिचीत हेमंत रामनरेश शुक्ला याने विनय पुणेकर यांचा खून केला असल्याची माहिती, पोलिसांना दिली. आरोपी हेमंत शुक्ला यांने रचलेल्या कटकारस्थान साक्षी ही सहभागी होती. त्याआधारे नागपूर पोलिसांनी साक्षी ग्रोवरेला अटक केली होती. ती सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीवासात आहे.
आरोपी हेमंत शुक्ला ४ महिने वेशभूषा बदलून फिरत होता : विनय पुणेकर यांची हत्या केल्यानंतर आरोपी हेमंत नागपूर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळे ठिकाण बदलून नवीन माबाईल फोनचा वापर करत होता. एवढंच नाही तर तो स्वतःच्या शरीराची ठेवण आणि वेशभूषा सुद्धा बदलत होता. त्यामुळं आरोपी हेमंतपर्यंत पोहचणं पोलिसांना अवघड झालं होतं. सदर पोलिसांनी अथक परिश्रम करून वेगवेगळया टिम तयार करून रायपुर, मैहर, सतना, वाराणसी, दिल्ली, हरियाणा याठिकाणी वारंवार शोध घेतला असता, तो मिळाला नाही. सदर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याकरीता अथक प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी बुध्दीकौशल्याने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. पोलिसांनी आरोपी हेमंत शुक्लाला लुधीयाना येथून अटक केलीय.
हत्येमागे लव्ह ट्रँगलचा अँगल? : विनय आणि साक्षी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून मैत्री होती. ते एकमेकांच्या प्रेमात होते. साक्षीच्या जीवनात मध्यप्रदेशचा रहिवासी हेमंत शुक्ला नामक आला. हेमंतला साक्षी आणि विनय पुणेकरची मैत्री अजिबात आवडत नव्हती. साक्षी आणि विनय यांचे प्रेमसंबंध आहे या संशयावरून हेमंत साक्षीचा मोबाईल तपासात होता. साक्षीने हेमंत आणि विनयची भेट घडवून आणली होती.
हेही वाचा -
फोटोग्राफर विनय पुणेकर हत्या प्रकरण लव्ह ट्रँगलमुळे झाल्याचा पोलिसांना संशय, महिलेला अटक