पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज (18 डिसेंबर) कोरेगाव भीमा आयोगाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अमित शाह यांचं वक्तव्य म्हणजे : "भाजपा पक्ष हा आत्ता जन्माला आलेला पक्ष आहे. त्यापूर्वी जनसंघ आणि आरएसएस होते. या संघटनेनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक विरोध केला. अमित शाह यांचं वक्तव्य म्हणजे त्यांची जुनी विचारसरणी पुन्हा बाहेर पडली आहे, त्यात नाविन्य असं काही नाही. आरएसएसच्या त्या वेळच्या ज्या काही योजना होत्या, त्या आजही त्यांना अंमलात आणता येत नाहीत. यासाठी त्यांची सर्वात मोठी अडचण काँग्रेस पक्ष नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळं त्यांचा हा जळफळाट होत राहणार अशी सध्याची परिस्थिती आहे," असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भाजपावर टीकास्त्र डागलं.
कोरेगाव भीमा आयोगाला भेट : प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, "कोरेगाव भीमा आयोगाला आम्ही एक पत्र दिलं होतं. त्यावेळी मलिक साहेब तेव्हा चीफ सेक्रेटरी, सुहास हक पोलीस अधीक्षक तर देवेंद्र फडणवीस हे तेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा या तिघांनाही दंगलीची बातमी जेव्हा कळाली आणि जर कळाली नसेल तर ती का कळाली नाही. याचा शोध घेणं हे कमिशनचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तसंच ते पुन्हा घडू नये, यासाठी सूचना सरकारनं मागितली आहे. तसंच येत्या 17 तारखेला त्यांनी आर्ग्युमेंटसाठी वेळ दिलेला आहे. तसंच मी आज आयोगाला म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिज्ञपत्र दिल्यावर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत शासनाचं धोरण कसं चुकलं हे सांगितल होतं. यामुळं त्यांच्याकडे याबाबत काही कागदपत्रं असतील ती देखील मागून घ्यावी," असं यावेळी आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा