सोलापूर Praniti Shinde : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नाही. काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात गावभेटीच्या नावाखाली प्रचार सुरू केला आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना निवडणूक रोख्यांच्या मुद्यावर त्यांनी मोदी सरकारवर आसूड ओढत कोविड लसीच्या मुद्यावर वादग्रस्त विधान केले आहे. मी तर आजतागायत कोविडची लस घेतलीच नाही. कोविडच्या लसीची सक्ती करून भाजपावाल्यांनी जनतेचे नाही ते आजार बाहेर काढले. लस घेतलेल्या लोकांना रक्तदाब, मधुमेह सारखे आजार झालेत, असे वादग्रस्त विधान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनी सोलापुरात ग्रामीण भागात गावभेट दौऱ्यावर असताना केले आहे.
निवडणूक रोख्यांतून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्टेट बँकेचा इलेक्ट्रॉल बॉंडचा घोटाळा उघडकीस आला. निवडणूक रोखे योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाने हजारो कोटींची वसुली केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी कोव्हिड लस तयार केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीने खरेदी केलेल्या निवडणूक रोख्यांवर भाष्य केले. त्याचवेळी कोविड लसीचा डोस घेतल्यानंतर लोकांना कोणकोणती दुखणी सुरू झाली, यावर वादग्रस्त भाष्य केले. स्वतः कोविडची लस मात्र न घेतल्याची त्यांनी कबुली दिली.
कोविड लसीवर संशय निर्माण : केंद्रातील मोदी सरकारने उपकृत केलेल्या कंपन्यांपैकी ८० टक्के कंपन्यांनी भाजपाला निवडणूक रोख्यांच्या रूपाने मदत केली. कोविड काळात मोदी सरकारने पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने तयार केलेल्या कोविड-१९ लस खरेदी करून त्याच्या दोन-दोन मात्रा लोकांना बळजबरीने टोचल्या. मात्रा टोचून घेतलेल्या लोकांना पंतप्रधान मोदी यांची छबी असलेले प्रमाणपत्रही दिले. लस खरेदी केल्याची परतफेड म्हणून सीरम कंपनीने शंभर कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले. यातून मोदी सरकारने हितसंबंध जोपासल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला; परंतु ही कोविड-१९ मात्रा लोकांचे आयुष्य मारून टाकण्यासाठीच होती की काय, अशी शंका वाटते. कारण ही मात्रा घेतलेल्या असंख्य लोकांना नंतर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अन्य दुखणे सुरू झाले आहेत. त्याचा सार्वत्रिक अनुभव समोर येत असल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला. प्रणितींच्या वक्तव्याने कोविड लसींवर संशय निर्माण केला जात आहे.
हेही वाचा :