मुंबई - Pawan Kalyan took oath : तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी आज १२ जून रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्याचबरोबर दक्षिण चित्रपटसृष्टीतील 'पॉवर स्टार' म्हणून ओळखले जाणारे आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी पवन कल्याणच्या मेगास्टार कुटुंबानंही शपथविधीला हजेरी लावली होती.
पवन कल्याण यांनी मोठ्या भावाच्या पायाला केला स्पर्श
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, पवन कल्याण यांनी पंतप्रधान मोदी, राज्यपाल एस अब्दुल नजीर, सुपरस्टार रजनीकांत यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले त्यांचे मोठे भाऊ चिरंजीवी यांच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. पवन कल्याण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना त्यांची परदेशी पत्नी अॅना लेझनेवा हा खास क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होत्या.
शपथविधी सोहळ्याला मेगास्टार परिवारासह रजनीकांतची उपस्थिती
पवन कल्याण यांचे संपूर्ण कुटुंब आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. या सोहळ्यात चिरंजीवी आपल्या कुटुंबासह सामील झाले होते. मात्र, राम चरण त्यांच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यानं तो या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही. येथे, मेगास्टार कुटुंबातील पवन कल्याणचे दोन्ही मोठे भाऊ (चिरंजीवी आणि नागा बाबू) हजर होते. साऊथ सुपरस्टार आणि थलैयवा रजनीकांत हे देखील विजयवाडा येथे पोहोचले होते. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे स्टार नातू ज्युनियर एनटीआर हे मेगास्टार कुटुंबासह शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता. पवन कल्याण यांनी आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर या पॉवर स्टारच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
हेही वाचा -
"संसदेच्या अधिवेशन काळात एनडीए 300..."; अजित पवारांना विश्वास - Ajit Pawar
दीपिका पदुकोणचा बेबी बंप पाहून चाहते म्हणतात, 'हिच्या पोटी जन्म घेणार कल्की!' - deepika padukone