मुंबई BMC On Tree Cutting : पावसाळा सुरू होण्याआधी खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र, या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधीच माहिती देण्यात आलीय. तसंच यात प्रशासनाला सहकार्य करून आपापली वाहने अशा ठिकाणांवरुन काढून घ्यावीत, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलय. झाडांच्या फांद्या छाटणीदरम्यान जर दुर्दैवाने वाहनांचं नुकसान झाल तर महानगरपालिका त्यास जबाबदार राहणार नाही, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलय.
महापालिकेने झटकले हात : मुंबई महानगरात सर्वेक्षण केल्यानंतर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी करण्याचं काम उद्यान विभागाकडून सुरू आहे. मात्र, ही छाटणी सुरू असताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. यातून अनेकदा कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वाद झाल्याचे प्रसंग घडले आहेत. कामांमध्ये व्यत्यय देखील येत आहे. वाहनांचं नुकसान होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधी सूचना दिली जाते. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळेनुसार आपापली वाहने संबंधित ठिकाणाहून काढून सुरक्षित अशा अन्य ठिकाणी न्यावीत. प्रशासनाने आवाहन करूनही जर नागरिकांनी संबंधित ठिकाणांहून वाहने काढली नाहीत आणि फांद्या छाटणीदरम्यान वाहनांचं नुकसान झालं तर महानगगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही असं पालिका प्रशासनाने स्पष्ट केलं.
1 लाख झाडांच्या छाटणीचे उद्दिष्ट : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती तसच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. यंदा मुंबई महानगरात एकूण १ लाख १२ हजार ७२८ झाडांच्या छाटणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी दिनांक १२ एप्रिल २०२४ अखेरपर्यंत १५ हजार ८२१ झाडांची छाटणी झाली आहे. दिनांक ७ जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित ९६ हजार ९०७ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवलं आहे. मृत आणि कीड लागलेली तसंच वाकलेली ४१४ झाडं सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी ३३८ झाडे काढून टाकण्यात आली असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितलं. खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहनही परदेशी यांनी केले आहे.
झाडांची निगा राखण्याची मालकी संबंधित मालकाची : उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महानगरपालिकेद्वारे नियमितपणे राखण्यात येते. गृहनिर्माण सहकारी संस्था, हाऊसिंग सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा याठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. हाऊसिंग सोसायटी, शासकीय आणि निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या वृक्षांच्या छाटणीकामी, संतुलित करण्याबाबत महानगरपालिकेने ३ हजार ६९० नोटिसा दिल्या असल्याचं परदेशी यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- गडचिरोली-चिमूर लोकसभेत भाजपाच्या 'नेत्यां'ना कॉंग्रेसचे 'किरसान' अडसर ठरणार की 'नेते' हॅट्रिक करणार? - Gadchiroli Chimur Lok Sabha
- EVM-VVPAT मशिनबाबत निवडणूक आयोगानं सर्वांची भीती दूर करावी - सर्वोच्च न्यायालय - EVM VVPAT case hearing
- औरंगजेब आणि मोदी दोघेही एकाच मातीतले; खासदार संजय राऊत यांची टीका - Lok Sabha Election 2024