पालघर Palghar Loksabha 2024 Result : पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नसला, तरी हा मतदारसंघ स्वतःकडे घेऊन तेथून हेमंत सवरा यांना 1 लाख 84 हजार 422 इतक्या प्रचंड मतांनी निवडून आणण्यात भाजपाला यश आलं. अर्थात त्यामध्ये मित्र पक्षाचाही वाटा आहे. परंतु पालघर लोकसभा मतदारसंघातील लढत वरवर तिरंगी दिसत असली, तरी ती एकांगी झाल्याचं निवडणूक निकालावरून स्पष्ट झालय. बहुजन विकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचं एकूण निवडणूक निकालावरून दिसतं. पालघर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचा एक आमदार, एक आमदार शिवसेनेचा आहे तर एक आमदार माकपचा आहे.
दहा वर्षांपासून युतीचेच वर्चस्व : पालघर लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून शिवसेना-भाजपाचे वर्चस्व असल्याचं वारंवार झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होतं. विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना युतीचं वर्चस्व नसलं, तरी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपा-शिवसेनेचं वर्चस्व असतं हे प्रत्ययाला येत असतं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या 2014, 2019 आणि आत्ताची निवडणूक पाहिली तर बहुजन विकास आघाडीचं या मतदारसंघावरचं वर्चस्व कमी झाल्याचा संदेश निवडणूक निकालातून मिळतोय. यापूर्वी दुसऱ्या स्थानावर असलेली बहुजन विकास आघाडी आता तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
ठाकुरांच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी : पालघर लोकसभा मतदारसंघातील जे तीन शहरी विधानसभा मतदारसंघ येतात त्यात सर्वाधिक मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मतदार नोंदणीतही शहरी भागातील मतदार संख्येत मोठी वाढ झाली होती. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील हे तीन आमदार असतानाही लोकसभा निवडणुकीत मात्र या पक्षाला मोठी पिछेहाट सहन करावी लागलीय. आमदार राजेश पाटील हे शेतकरी तसंच अन्य समाज घटकांसाठी आणि उपेक्षितांसाठी वारंवार आंदोलन करत असतात. परंतु त्यांना त्यांच्याच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवता आलं नाही. वसई तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघात किमान दीड लाखाचं मताधिक्य घेऊ, असा जो विश्वास बहुजन विकास आघाडीला होता, तो फोल ठरला. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यातच राजेश पाटील यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.
शहरी आणि ग्रामीण मतदारही कमळाचे : शहरी मतदार कायम भाजपाच्या बाजूनं असतो, हे या लोकसभा निवडणुकीतही सिद्ध झालय. वसई-विरार परिसरातील नागरी प्रश्न सोडवायचे असतील, तर केंद्रात सत्ता असलेल्या पक्षालाच निवडून द्यावं लागेल, ही कदाचित वसई विरार परिसराची मानसिकता झाली असावी. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत सावरा यांना या तीनही विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळालं. त्यातच हेमंत सावरा यांच्यासाठी भारतीय जनता पक्षानं मोठी व्यूहरचना केली. या मतदारसंघातील गुजराती आणि उत्तर भारतीय लोकांसाठी त्या परिसरातील नेत्यांना आणून प्रचाराचं सूक्ष्म नियोजन केलं. त्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय विनीत मुकणे यांच्यासह अन्य नेत्यांनी केलेलं सूक्ष्म नियोजन येथे उपयोगी पडलं. प्रत्येक मतदारांपर्यंत भाजपाच्या कार्याची माहिती उमेदवार जाहीर होण्याअगोदरच पोहोचवण्यात आली होती.
राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश फायद्याचा : राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांची नाराजी दूर करून त्यांना भाजपात आणल्यानं त्याचा फायदा झाला. गावित यांचा आदिवासी मतदारांवर असलेला प्रभाव आणि त्यांची स्वतंत्र मतपेढी ही हेमंत सावरा यांच्या उपयोगी पडलेली दिसते. डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपाचे आमदार विनोद निकोले असून त्यांच्यामुळं तसंच वाढवण बंदराला असलेल्या शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या विरोधामुळं या मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांना मताधिक्य मिळालेलं दिसतं. पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत. त्यामुळं या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात कामडी यांना मताधिक्य अपेक्षित असताना फक्त डहाणूमधूनच मताधिक्य मिळालं. विक्रमगड मतदारसंघात मात्र डॉ. सवरा यांना चांगलं मताधिक्य मिळालं. मोठा मतदार संघ असून सर्वात उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही हेमंत सावरा यांनी ज्या पद्धतीनं मताधिक्य मिळवलं, ते पाहिलं तर पालघर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं शिक्कामोर्तब झालंय. या मतदारसंघावर भाजपाचं एकहाती वर्चस्व असल्याचं दिसून येतं.
भरत राजपूत यांची भूमिका महत्त्वाची : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी राजेंद्र गावित हे शिंदे सेनेत असताना त्यांना विरोध करून या मतदारसंघावर भाजपाचा दावा ठोकला. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे 35 ते 40 मतदार, तर शिंदे गटाचे मतदार अवघे सात-आठ टक्के असल्याचा आरोप केला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला. राजपूत यांनी केलेली खेळी यशस्वी झाली आणि त्यांनी वरिष्ठांकडे प्रयत्न करून हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला खेचून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नंतर खासदार गावित यांच्यासोबतची नाराजी दूर करून त्यांचं स्थानिक राजकारणात पुनर्वसन करण्याचा शब्द भाजपानं दिल्यामुळं हा मतदारसंघ जिंकणं सोपं झालय.
विधानसभा जिंकण्याचं आव्हान : आता भरत राजपूत यांनी लोकसभा मतदारसंघ आणि तीन विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी एक संकल्प पूर्ण झाला असून आता विधानसभेला तीन जागा जिंकण्याचं लक्ष भाजपानं ठेवलंय. परंतु राज्यात महायुतीविरुद्ध असलेलं वातावरण आणि लोकसभेच्या निवडणुकीत राज्यभर जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं दिलेला कौल लक्षात घेता हे आव्हान ते कसं पेलतात हे पाहावं लागेल.
रवींद्र चव्हाण विजयाचे शिल्पकार : या निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. परंतु फडणवीस यांचे विश्वासू सहकारी विनित मुकणे यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली. विजय मिळवण्यासाठीच्या रणनीतीचा भाग म्हणून गावित यांचा पक्ष प्रवेश करवून घेतला. 25 टक्के निवडणूक हातात घेतली आणि तोच या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरला. निवडणूक कशी जिंकण्याची व्यूहनीती आखण्यात मुकणे तरबेज आहेत. त्यांनी चार विधानसभा क्षेत्रातील खरे किंगमेकर हेरले होते. अमित चूरी यांना या निवडणुकीसाठी संपूर्ण जबाबदारी देऊन रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता. माजी आमदार आंनद ठाकुर, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेना उपनेते राजेश शहा, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, अशोक अंभुरे, संतोष चोथे, वीणा देशमुख, लक्ष्मीदेवी हजारी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळं हा विजय मी सर्वाना समर्पित करतो असं हेमंत सवरा म्हणाले.
हेही वाचा
- लोकसभा निवडणुकीत नाव घेतले नाही, विधानसभेला नाव घेऊन सांगणार याला पाडा - मनोज जरांगे पाटील - Manoj Jarange Patil
- पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात 18 सभा घेऊनही महायुतीचे 'हे' उमेदवार पराभूत, जाणून घ्या कारण - Maharashtra Lok Sabha results
- पीयूष गोयल जिंकले पण....गोपाळ शेट्टींच्या तुलनेत किती मताधिक्य घटलं? - North Mumbai Lok Sabha