मुंबई 11 Crore Reward to Cricketers : राज्य सरकारच्या वतीनं विधान भवनात शुक्रवारी विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारही खेळाडूंचं कौतुक केलं. तसंच भारतीय क्रिकेट संघानं अभूतपूर्व अशा खेळाचं दर्शन करून विश्वचषक जिंकला. यापुढंही याच पद्धतीनं ते कामगिरी करतील, अशी अशा व्यक्त करत भारतीय संघाला राज्य सरकारतर्फे 11 कोटी रुपयांचं बक्षीस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. यावरुन आता राजकारण तापलं आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल : बक्षीसाच्या घोषणेवरुन राज्यातील विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटत आहे. मात्र, राज्याच्या तिजोरीतून 11 कोटी रुपये देण्याची गरज नाही. बक्षीस द्यायचंच होतं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून रक्कम देणं अपेक्षित होतं," असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला चिमटा काढला.
भाजपाचं प्रत्युत्तर : भारतीय संघाला राज्य सरकारनं जाहीर केलेल्या बक्षिसावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली. या टीकेला भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. या प्रकरणाचे काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
तिजोरीतून 11 कोटी का? : "राज्याच्या तिजोरीतून 11 कोटी देण्याची काय गरज होती? आपलीच पाठ थोपटण्यासाठी राज्य सरकार बक्षीस जाहीर करत आहे. तसंच तिजोरी रिकामी होऊ द्या...गरीबांना मरू द्या पण सरकारला स्वतःची पाठ थोपटायची आहे," असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "राज्याच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती. प्रत्येकाला त्यांच्या (खेळाडू) कामगिरीचा अभिमान आहे आणि त्यांना पुरेशी बक्षीस रक्कम मिळते. मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतःच्या खिशातून 11 कोटी रुपये द्यायला हवे होते," असं म्हणत दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
11 कोटींचं बक्षीस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी भारतीय क्रिकेट संघाला ११ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. विधान भवन येथे ही घोषणा करण्यात आली. येथेच संघातील चार मुंबईकर खेळाडू अर्थात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मंत्री, आमदार हजर होते. दरम्यान, गुरुवारी मुंबईतील मरीन ड्राईव्हवर क्रिकेटपटूंची विजयी परेड काढण्यात आली होती. यावेळी लाखो क्रिकेट प्रेमी हजर होते.
हेही वाचा -
- T20 विश्वविजेत्या भारतीय संघाला महाराष्ट्र सरकारकडून 11 कोटींचे बक्षीस, विधान भवनात महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार - T20 world champion Indian team
- मरीन ड्राईव्ह परिसर पुन्हा चकाचक : आनंद महिंद्रांकडून पालिका कर्मचाऱ्यांचं कौतुक, टीम इंडियाच्या विजयी परेडनंतर 11 हजार किलोंचा कचरा साफ - Team India Victory Parade