मुंबई Online Gambling : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऑनलाइन जुगारावरून राज्य सरकारवर निशाना साधला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ड्रग्ज, ऑनलाइन जुगार, ऑनलाइन लॉटरी तरुणांना उद्ध्वस्त करत असून सरकार त्याकडं लक्ष देत नसल्याचा आरोप केला आहे.
त्यांची केस जनताच निकाली काढेल : रामदास कदम यांनी 'आमचा केसानं गळा कापू नका', अशी टीका भाजपावर केली आहे, त्यावर संजय राऊत म्हणाले, केसानं गळा कापू नका वगैरे ठीक आहे, पण 'हे' कोणाला सांगताहेत ते मला माहीत नाही. त्यांची केस आमच्याकडून संपलेली आहे. त्यावर मी बोलणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांची केस निकाली काढेल, असा टोला संजय राऊत यांनी रामदास कदम यांना लगावला. ज्या पद्धतीनं भाजपाकडून त्यांची अवेहलना सुरू आहे. त्यांच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही, ते त्यांचं त्यांनी बघावं, असं संजय राऊत म्हणाले.
तरुण पिढीला बरबाद करण्याचं काम : संजय राऊत पुढे म्हणाले, ऑनलाईन जुगार, ऑनलाईन लॉटरी, ड्रग्ज प्रकरणी मी वारंवार गृहमंत्र्यांना पत्र पाठवलंय. ड्रग्ज गुजरातमधून महाराष्ट्रात येताहेत. नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे शहरात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. ड्रग्जच्या आहारी तरुण पिढी जात आहे. त्याचबरोबर ऑनलाईन जुगार, ऑनलाईन लॉटरीचा मोठा फटका तरुण वर्गाला बसत आहे. त्यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे. सरकारनं तत्काळ यावर कारवाई करावी, असं संजय राऊत म्हणाले. ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता मिळतो. म्हणून ते ऑनलाईन जुगार, गेम बंद करत नाहीत, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी सरकारवर केला. याचे पुरावे देखील मी गृहममंत्र्यांना देऊ शकतो. ऑनलाईन जुगार, गेम बंद करा, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे, असं राऊत म्हणाले.
सर्वांच्या मनाप्रमाणं जागावाटप : लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडी, वंचितमध्ये चर्चा सुरू आहे. बुधवारच्या बैठकीत वंचित, महाविकास आघाडीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. प्रकाश आंबेडकरांचं समाधान होईल, असं आम्हाला वाटतं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले हट्ट सोडले आहेत. आघाडीमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होतं असं नाही. आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही, काही गोष्टी आमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या. त्यामुळं आघाडीमध्ये आघाडी टिकवण्यासाठी काही हट्ट सोडावे लागतात. आघाडीत आता काही हट्ट राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेनं सोडले आहेत. शिवसेनेनं आपल्या महत्त्वाच्या जागा आघाडीसाठी सोडल्या आहेत. कारण महाराष्ट्रमध्ये वेगळं चित्र निर्माण करायचं आहे. बुधवारी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अतिशय उत्तम झाली. काहीच घडलं नाही, असं सांगणं हे बरोबर नाही, असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
मोदींचे हुकूमशाही राज्य नकोय : बुधवारच्या बैठकीत वंचितच्या प्रस्तावावर चर्चा झाली. यानंतर आता वंचितच्या कार्यकारणीत प्रस्तावावर चर्चा होईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर आम्ही पुन्हा चर्चेला बसून प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू, असं राऊत म्हणाले. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पक्षाला मदत होईल, असं वागणार नाहीत. एकाधिकारशाही, हुकूमशाहीला खतपाणी घालणारे मोदींचं राज्य त्यांना नको आहे. त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे. म्हणून प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो आहोत, असं राऊत म्हणाले.
'हे' वाचलंत का :