नाशिक Pm Modi Nashik Visit : दिंडोरी मतदारसंघातील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात सभा होत आहे. कांदा प्रश्नावर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना सभास्थळी गोंधळ घालण्याची शक्यता असल्यानं पोलीस सतर्क झाले आहेत. कांद्याचा वांदा करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची काय परिस्थिती केली आहे.? आपले शेतकरी, मजूर, व्यापारी, यांच्या स्वप्नांची कशी होळी झाली यांचं उत्तर घेतलंच पाहिजे.? अशा आशयाचे मॅसेज विरोधकांकडून सध्या व्हायरल होत आहेत.
आपण जयघोषात प्रश्न विचारू : कालपर्यंत ते आपल्याला प्रश्न विचारत होते आणि आपण जयघोषात त्यांना उत्तर द्यायचो. आता आपण त्यांना जयघोषात प्रश्न विचारू, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ते उत्तर देतील, या अपेक्षा ठेऊन आपण पिंपळगाव बाजार समितीच्या सभेला जाऊ, असे मॅसेज विरोधकांमधून व्हायरल होत आहे.
काय आहेत प्रश्न :
- शेतीचं उत्पन्न दुप्पट करून त्याला योग्य भाव देऊ, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये केली होती. झालं का शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट आणि दिला का योग्य हमी भाव.?
- कांदा निर्यातबंदी करून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं काय हित साधलं पंतप्रधान मोदीजी आपण..? निवडणुकीच्या तोंडावर 550 डॉलर कांद्यावर निर्यातशुल्क आकारून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ का चोळलं ..?
- महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प जाहीर करून किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण केले...? ते केले तर कोणते आणि केले नाही तर का झाले नाही .?
- प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये आपण देणार होते. ते अद्याप न देवून आपण भारतीयांशी 420 पणा केला..?
- देशातील नेते भ्रष्टाचार करून काळा पैसा परदेशात स्विस बँकेत ठेवतात. तो काळा पैसा परत आणू असं आश्वासन आपण भारतीयांना दिलं होतं. तो काळा पैसा परत भारतात का आणला नाही..?
- दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळून भारतात आणू असं आश्वासन दिलं होतं. मग आणलं का भारतात दाऊद इब्राहिमला.?
- देशात शेतकरी आत्महत्या कधीही होऊ देणार नाही, असं आपण जाहीर केलं. मग तरीही शेतकऱ्यांना का आत्महत्या करावी लागतेय..?
- गॅस, पेट्रोल, डिझेल यांची भाववाढ रोखण्यासाठी आपण काय केलं.?
- मुद्रा लोन, आत्मभारत, स्वच्छ भारत, मेड इन इंडिया, मेकइन इंडिया या प्रकारच्या अनेक घोषणा केल्या त्याचं काय झालं.?
- मित्रपक्ष आणि स्वपक्षातल्या किती भ्रष्टाचारी नेत्यांवर आपण ED, CBI ची कारवाई केली.?
काहींना नजरकैदेत ठेवणार : नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावरुन शेतकरी आणि काही संघटना आक्रमक असल्यानं सभास्थळी त्यांच्याकडून निषेध व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून संबंधितांना प्रतिबंधात्मक नोटीसह बजावण्यात येणार असून काहींना खबरदारी म्हणून सभा संपेपर्यंत नजरकैदेत ठेवण्याची शक्यता आहे. तसेच सभास्थळी येणाऱ्यांवर करडी नजर राहणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना सभेत प्रवेश नाकारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिकमध्ये होत आहे. सभास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. तसेच मुंबई -आग्रा महामार्ग जिल्ह्यातील लॉज, हॉटेल, ढाबे यांची नियमित तपासणी केली जात आहे. निवासी राहणाऱ्यांची चौकशी होत आहे. यासोबत रेल्वे स्थानक, बस स्थानकावर पोलिसांनी 24 तास नजर ठेवली आहे. पंतप्रधानांच्या मार्गावर बॉम्बशोधक-नाशक, श्वानपथक या मार्फत नियमित तपासणी होत आहे. स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखा, गोपनीय शाखा, राज्य गुप्तवार्ता, दहशत विरोधी कक्ष, राज्य गुन्हे अन्वेषण यासह सर्व विभागांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.
हेही वाचा :
- पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये रोड 'शो', मुंबईत 'या' मार्गांवरील वाहतूक राहणार बंद - Narendra Modi road show in Mumbai
- लोकसभा निवडणूक 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणशीतून दाखल केला नामांकन अर्ज - PM Narendra Modi Nomination
- जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का?...; प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागावी - आनंद दवे - Anand Dave On Praful Patel