मुंबई OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस असून ते अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. लक्ष्मण हाके यांच्यासोबत सरकारच्या शिष्टमंडळानं आज भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात लक्ष्मण हाके यांच्या 4 समर्थकांचा सुद्धा समावेश असणार आहे.
ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण नको : मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी मागील 9 दिवसांपासून लक्ष्मण हाके बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान लक्ष्मण हाके यांची अनेक ओबीसी नेत्यांनी भेट घेतली. तसंच त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना भेटलं. यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री अतुल सावे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता. याप्रसंगी सरकारी शिष्टमंडळाकडून काही कागदपत्रं लक्ष्मण हाके यांना देण्यात आली. यानंतर ओबीसींचं शिष्टमंडळ आज सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
सरकार सकारात्मक, कायम पाठीशी : छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर या नेत्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे. लक्ष्मण हाके यांच्या ४ समर्थकांचा सुद्धा या शिष्टमंडळात समावेश असणार आहे. सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके तसंच उपोषणकर्त्यांना भेटल्यानंतर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "हाके यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेष म्हणजे आम्हाला लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीची काळजी असून याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे."
कायद्याच्या चौकटीत प्रश्न सोडवायचे आहेत : ओबीसी शिष्टमंडळाच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये असं आम्हाला वाटतं. एखाद्या समाजाला असं वाटतं की, आमचं काहीतरी अहित केलं जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, असं काही करण्याची सरकारची कुठलीही मानसिकता नाही. आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. हे प्रश्न सोडवताना ते कायद्याच्या चौकटीत सोडवायचे आहेत, तसाच प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे."
हेही वाचा :