पुणे - पुण्यातील हडपसर येथील भाजपाचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना काल घडलीय. या घटनेला 30 तासांपेक्षा जास्त काळ झाला असून अजूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. असं असताना या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जातेय. त्यातच आता आमदार योगेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, यात राजकारण न करता पोलीस आपलं काम करत आहेत. सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा, शेवटी ही यंत्रणा आहे आणि पोलीस लवकरच आरोपींचा शोध घेतील, असं यावेळी टिळेकर यांनी म्हटलंय.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतीश वाघांचा मृतदेह : काल पहाटेच्या सुमारास पुण्यातील फुरसुंगी येथील सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्लू बेरीसमोर सतीश वाघ हे थांबले असता त्यांना जबरदस्ती चारचाकी शेव्हरले एन्जॉय या गाडीत बसवत त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने तत्काळ हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा तपास सुरू असतानाच यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला एकच खळबळ उडाली.
लवकरच पोलीस आरोपींचा शोध घेणार : आता या सर्व प्रकरणावर आमदार योगेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणालेत की, काल याच जागेवरून माझ्या मामांचं अपहरण झालंय आणि मग त्यांचं अपहरण करून खून झाल्याची घटना घडलीय. पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत. लवकरच पोलीस या मागील आरोपींचा शोध घेतील. आज आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पोलीस यंत्रणा त्यांचं काम करून लवकरच आरोपींचा शोध घेईल. यात राजकारण न करता पोलीस आपलं काम करतील, यात सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा, शेवटी ही यंत्रणा असून सामान्य नागरिक यांच्यावर अन्याय झाला तरी राज्य सरकार चांगलं काम करीत आहे. मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी फोन केलेत. माझ्या कुटुंबीयांच्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे आहेत, असंही यावेळी टिळेकर म्हणाले.
हेही वाचा :