लातूर NEET Paper Leak Scame : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) घोटाळ्यात लातूर जिल्ह्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. लातूर जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. कातपूर येथील शाळेचा मुख्याध्यापक जलील पठाणच्या विरोधात लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळं आरोपी जलील पठाणचं निलंबित करण्यात आलं आहे.
दोन्ही आरोपींना अटक : नीट घोटाळा प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलील पठाणचं लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी निलंबित केलं आहे. आरोपी जलील पठाण लातूर जिल्ह्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होता. जलील पठाण आणि संजय जाधव हे दोघे लातुरात नीट पेपरफुटीचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे.
जलील पठाणची विभागीय चौकशी : आरोपी मुख्याध्यापक जलील पठाणवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यामुळं लातूर जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. "त्यांची जबाबदारी शैक्षणिक कामकाज असताना त्यांनी सेवेबद्दल हलगर्जीपणा आणि अनास्था दिसून आली आहे, तसंच त्यांचं निलंबन करुन विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे." जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना हे सांगितलं.
मुख्यध्यापकाचं निलंबन : लातूरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक संजय तुकाराम जाधव आणि लातूर नजीकच्या कातपूरच्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलील उमरखान पठाण हे दोघंही लाखो रुपये घेऊन नीट परीक्षेत 550 पेक्षा अधिक मार्क वाढवून देण्याचं रॅकेट चालवत असल्याची माहिती नांदेड एटीएसला मिळाली. त्यानंतर एटीएस पथकानं लातूरात येत या दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यांच्यासह रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एकूण चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लातूरच्या जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना अटकही करण्यात आली. पोलिसांनी दोघांना लातूरच्या न्यायालयात हजर केलं असता नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याची गंभीर दखल घेत लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडे निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. त्यास तत्काळ मंजूर देत मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आरोपी जलील पठाण याच्या निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत.
हेही वाचा :