नाशिक Nashik Teacher constituency : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी सकाळी ७ पासून केंद्रावर गर्दी केली आहे. या निवडणुकीत 21 उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढत असल्याचं चित्र आहे. यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारामध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे. या लढतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. नाशिक विभागातील 69 हजार 318 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात 29 मतदान केंद्र : नाशिक शहरात सर्वाधिक 10 मतदान केंद्र आहेत. शिक्षक मतदार संघासाठी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथे एकूण 69 हजार 318 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नाशिक जिल्ह्यात 25 हजार 302 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी जिल्ह्यात 29 मतदान केंद्र असून त्यात प्रामुख्याने चांदवड, नांदगाव, देवळा, दिंडोरी, त्रंबक, पेठ, इगतपुरी, सिन्नर येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र तर सटाणा, निफाड, येवला येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्र असून मालेगाव शहर आणि ग्रामीण येथे तीन मतदान केंद्र तर नाशिक शहर आणि परिसरासाठी एकूण 10 मतदान केंद्र अशा एकूण 29 मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे.
मुख्यमंत्री जळगाव दौरा : या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किशोर दराडे, उद्धव सेनेचे उमेदवार संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार तसंच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून रिंगणात असलेले महेंद्र भावसार यांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं युतीतील बेबनाव दिसून आला. दोघा पक्षाच्या नेत्यांनी शिक्षण संस्था चालकांच्या बैठका तसंच शिक्षकांचे मेळावे देखील घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची निवडणूक असल्याचं लक्षात घेऊन नाशिक तसंच जळगावचा दौरा केला होता. मतदानासाठी शिक्षकांना पैसे दिले जात असल्याचा आरोपही महायुतीकडून करण्यात आला आहे.
जिल्हा निहाय मतदान : नाशिक 25 हजार 302, धुळे 8 हजार159 ,जळगाव 13 हजार 112, नंदुरबार 5 हजार 393, अहमदनगर 17 हजार 392 एकूण 69 हजार 318
पैसे वाटप करताना पाच जणांना अटक : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला पाचही जिल्ह्यातील मतदार आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून सात ते आठ हजाराची सोन्याचा मुलामा असलेली नथ, पैठणी, जोधपुरी कापडाचे सूट तर कुठे पैशाचे पाकिट थेट शिक्षक मतदारांच्या घरोघरी पोहोचवण्यात आले. अशात मनमाडला पैसे वाटप करताना दोघांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सव्वा दोन लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसंच येवल्यातून दोघांना पकडून त्यांच्याकडून 20 हजाराची रोकड पथकाने जप्त केली.
बदनाम करण्याचा प्रयत्न : बूथ खर्चासाठी आमच्या कार्यकर्त्यांकडे असलेल्या तुटपुंज्या पैशाचं भांडवल करून काही प्रवृत्ती आम्हाला बदनाम करण्याचे कट कारस्थान करत आहेत. या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिक्षक मतदार त्यांना त्यांची जागा मतदानातून दाखवून देतील असा टोला अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे लागावला.
हेही वाचा