नाशिक Kusumagraj Kavya Udyan : मराठी भाषेच्या समृद्धीत अमूल्य भर घालणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावे 20 वर्षांपूर्वी पंचवटीतील गोदावरी नदीच्या तीरावर अद्यावत उद्यान उभारण्यात आलं. मात्र, नेहमीप्रमाणे लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळं सद्यस्थितीत हे उद्यान भकास झालंय. तसंच तेथे शब्दप्रेमींऐवजी आता मद्यपींचा वावर दिसून येत आहे. करोडो रुपये खर्चूनही उद्यानाचं सौंदर्य, वास्तू जपली जात नसल्यानं नाशिककरांनी खंत व्यक्त केली आहे.
शहरापासून काहीशा निर्जन स्थळी कवी कुसुमाग्रजांचं उद्यान सुमारे वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलं. या उद्यानात कालानुरूप अनेक बदल झाले, मात्र उद्यानाकडं झालेले दुर्लक्ष कायम आहे. या उद्यानाची सद्यस्थितीत दुरवस्था झाली आहे. त्यामुळं या वास्तूची दुरुस्ती व्हावी यासाठी मराठी भाषा प्रेमींकडून अनेकदा प्रशासनाकडं निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली. तसंच कोट्यवधी रुपयांचा निधी उद्यानासाठी खर्च करण्यात आला. मात्र, देखभाली अभावी उद्यानाचं सौंदर्य लोप पावत चाललं असून येथील शिल्प मोडकळीस आलं आहे.
कशी आहे उद्यानाची अवस्था : सद्यस्थितीत कुसुमाग्रज उद्यानाची बिकट अवस्था झाली आहे. कविता लिहिलेल्या शिळा तुटल्या आहेत. उद्यानातील पेव्हर ब्लॉक, फरशा फुटल्या आहेत, नाटकांचे संवाद लिहिलेले स्टॅन्ड आणि त्यावरील शिळा मोडकळीस आल्या आहेत. उद्यानाच्या संरक्षण जाळ्याही गर्दुल्यांनी तोडून नेल्याचं चित्र आहे. इतकंच नाही तर उद्यानाच्या एका कोपऱ्यात चूल मांडल्याचं आढळलं. तसंच स्वच्छतेअभावी येथे दुर्गंधी पसरली असून उद्यानातील स्वच्छतागृहांची देखील बिकट अवस्था झाली आहे.
मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारणार : एकीकडे उद्यानाची अशी अवस्था झाली असताना दुसरीकडे आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या स्मारकात अतिरिक्त बांधकाम करून तेथे मराठी भाषा अभ्यास केंद्र तयार केलं जाणार आहे. नाशिक शहराच्या टिळकवाडी परिसरातील जलतरण तलावा शेजारील कुसुमाग्रजांच्या स्मारकात हे मराठी भाषा अभ्यास केंद्र तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी कुसुमाग्रजांचं निवासस्थान असून त्यांच्या हयातीत याच परिसरात वाचनालय देखील उभारण्यात आलं होतं. नाशिक मनपाच्यावतीनं कुसुमाग्रजांच्या साहित्याचं इथं जतन करण्यात आलंय. याठिकाणी अतिरिक्त बांधकाम करून अद्यायावत असं मराठी भाषा अभ्यास केंद्र तयार करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. असं जरी असलं तरी उद्यानाची डागडुजी प्राधान्यानं होण्याची गरज आहे.
हेही वाचा -