नाशिक Godavari Aarti : काशीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी महाआरतीस प्रारंभ होणार असला, तरी दोन संघटनांमधील वाद आता टोकला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीनं पोलीस संरक्षणाची मागणी जिल्हाधिकारी जलल शर्मा यांच्याकडं केली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही संघटनांचा अहवाल राज्य शासनाकडं पाठवला आहे. त्यामुळं मोठ्या प्रतीक्षेनंतर गोदावरी आरतीसाठी राज्य सरकारकडून प्राप्त झालेला 11 कोटी 67 लाखांचा निधी परत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आरतीच्या वेळी पोलीस बंदोबस्त द्या : गोदावरी महाआरतीच्या अधिकारावरून निर्माण झालेला वाद शांत होण्याच्या मार्गावर दिसत नाही. गंगा गोदावरी पुरोहित संघानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना गोदाआरतीच्या अधिकाराचं पत्र दिलं आहे. त्यानंतर शुक्रवारी गोदावरी सेवासमितीनं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. गोदावरी नदी ही सर्वांची असून तिची आरती करण्याचा अधिकार सर्वांना हवा. रामतीर्थावर फक्त पुरोहित संघाचा अधिकार असणं चुकीचं आहे. तरीही आम्ही दुतोंड्या मारुतीजवळ गोदा आरतीस प्रारंभ करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारी सायंकाळी सातला ही आरती होणार असून त्यासाठी अनेक आखाड्याचे प्रमुख महंत, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, इस्कॉनचे धर्मगुरू यासह आमदार देवीयनी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे यांना निमंत्रण दिलं आहे. पुरोहित संघासह साधू महंत यांनी आरतीला विरोध केल्यामुळं वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आरतीच्या वेळी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीनं केली आहे. आता पोलीस संरक्षणात गोदावरी होणार की त्यात काही विघ्न येणार, याकडं नाशिककरांचं लक्ष लागून आहे.
आर्थिक गुंतागुंत : जुलै 2023 मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत समितीची बैठक झाली होती. त्यांनी समितीच्या कामकाजाविषयी दिशा स्पष्ट करतांना शासकीय निकष काय असावेत, ते सांगितलं होतं. त्यानुसार समितीच्या वतीनं ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. समिती सदस्यांनी आयोध्या, काशी, वृंदावन या ठिकाणी जाऊन होणाऱ्या महाआरतीचा अभ्यास केला आहे. त्यानंतर नाशिक गोदाकाठावर आरती करण्यासाठी स्थान निश्चित केलं. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना गोदाकाठावरील मंदिराचा, कुंडांचा इतिहास समजावा, यासाठी मार्गदर्शक नेमण्यात यावेत, महिला पुरोहितांचा पूजा, आरतीच्या कामात सहभाग असावा यासह अन्य काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आता महाआरतीसाठी दर महिन्याला येणाऱ्या 50 ते 55 हजार रुपयांच्या खर्चासाठी निधी संकलनाचा मुद्दा पुढं आल्यापासून वादाला सुरूवात झाल्याचा दावा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचं अध्यक्ष जयंत गायधनी यांनी केला आहे.
अनेक वर्षांपासून आम्ही स्वखर्चानं आरती करतो : "गेल्या अनेक वर्षापासून पुरोहित संघ गोदावरीची आरती करत आहे. पुरोहित संघानं आजवर गोदाआरतीत कुठलाही जातीभेद केलेला नाही. यामुळं पुरोहित संघाला सर्वांचा पाठिंबा आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यापासून या वादाला सुरूवात झाली. अनुभव नसलेले गोदावरीच्या आरतीविषयी बोलत आहेत. आम्ही त्यांना आरतीच्या नियोजनात सन्मानपूर्वक बोलवत आहोत", असं गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी म्हटलं आहे.
शासनाला अहवाल पाठवला : गोदावरी आरती संदर्भात दोन्ही संघटनांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत राज्य शासनाला कळवलं आहे. त्यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का :