नाशिक Onion Export Ban : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी 18 फेब्रुवारीला अटी-शर्तीनुसार कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी केलेल्या घोषणेनंतर 48 तासांच्या आत वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी अमित शाह यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवली आहे. त्यामुळं कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे. या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालाची नाराजी आहे.
कांद्या निर्यात बंदी हटवा : कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं 7 डिसेंबरला कांदे निर्यात बंदी केली होती. ही निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत असल्याचं त्यावेळी अध्यदेशात म्हटलं होतं. मात्र, गुजरातमधील शेतकरी आणि वाहतूकदारांनी कांद्या निर्यात बंदी हटवावी, अशी जोरदार मागणी केली होती.
निर्याती बंदीचा निर्णय फिरवला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत तीन लाख टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती. यासोबतच बांगलादेशला 50 हजार टन कांदा निर्यात करण्यासही मान्यता देण्यात आली. मात्र, दोन दिवसांतच कांदा निर्याती बंदीचा निर्णय फिरवण्यात आला आहे.
मंत्रीगटाच्या मान्यतेनंतर निर्यातीला मिळणार परवानगी- वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं की, "निर्यात बंदीचा निर्णय अजूनही कायम आहे. कांदा निर्यात बंदीची अंमलबजावणी सुरूच राहील. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा, ही केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. यासोबतच आंतरमंत्रालयीन गटाच्या मान्यतेनंतर मित्र देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
कांद्याच्या भावात वाढ : लासलगाव बाजार समितीत 17 फेब्रुवारीला कांद्याला 1 हजार 280 रुपये प्रतिक्विंटल भाव होता. मात्र, सरकारनं 19 फेब्रुवारी रोजी निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे भाव 40 टक्क्यांनी वाढून 1 हजार 800 रुपये प्रति क्विंटल झालाय. 31 मार्चनंतर महाराष्ट्रात रब्बी हंगामात कांद्याच्या उत्पादनात घट होईल, असं मानलं जात आहे.
'हे' वाचलंत का :