बुलढाणा MP Prataprao Jadhav : मेहकर तालुक्यातील मादनी या छोट्याशा खेडेगावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेले खासदार प्रतापराव गणपतराव जाधव आता केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बनले आहेत. खासदार जाधव यांचा हा प्रवास काही साधासुधा आणि सोपा नव्हता. मात्र, अनेक आव्हानांवर मात करत खासदार जाधव सलग तीनदा आमदार आणि सलग चौथ्यांदा खासदार झाले.
पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री : वऱ्हाडातील बुलढाणा लोकसभेतून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचीही मोदींच्या तिसऱ्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलीय. त्यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. जाधवांच्या रुपानं 1997 नंतर तब्बल 22 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळालंय. प्रतापराव जाधव हे 1990 पासून राजकारणात सक्रीय आहेत. पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा प्रतापराव जाधवांचा प्रवास राहिलाय. 1992 ते 1995 दरम्यान त्यांनी मेहकर पंचायत समितीचे सदस्य पदापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर ते 1995 ते 2009 दरम्यान तीन वेळा आमदारही होते. याच दरम्यान त्यांनी राज्यात क्रीडा मंत्री म्हणूनही कामही पाहीलंय. यानंतर 2009 पासून ते या मतदारसंघाचे खासदार आहेत.
फटाके फोडून आनंदोत्सव साजरा : खासदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री होताच जिल्हाभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. जिल्ह्याच्या भूमिपुत्राची वर्णी आता थेट दिल्लीच्या तख्तावर लागली असल्यानं जिल्ह्यात सगळीकडे फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर जाधवांच्या मादनी या गावातील वर्गमित्र आणि कार्यकर्त्यांना आनंद झाला. तसेच खासदार प्रतापराव जाधव यांना कृषिमंत्री पद मिळावं, अशी अपेक्षा कार्यकर्ते आणि वर्गमित्रांनी व्यक्त केली.
प्रतापराव जाधव झाले केंद्रीय राज्यमंत्री : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याला मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री पदाची भेट दिल्याचं आधीच जाहीर केलं होतं. ते म्हणाले की, " खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपानं 1997 नंतर या जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपद मिळालं. त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास होईल. रेल्वे मार्ग, नदी जोड प्रकल्प आणि एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. जनतेनं प्रतापरावांना संधी दिली म्हणूनच हे शक्य झालंय."
हेही वाचा:
- 'पैलवान ते केंद्रात मंत्री', खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद कसं मिळवलं? - Murlidhar Mohol
- साऊथ अभिनेता नितीन स्टारर 'रॉबिनहूड'च्या टीमनं सेटवर रामोजी राव यांना वाहिली आदरांजली... - RAMOJI RAO PASSES AWAY
- शिंदे गटाच्या नेत्यांची बालीश बडबड; शिवसेनेच्या 'त्या' दाव्यावरुन ठाकरे गटाची टीका - Shivsena MPs