नागपूर Nagpur Hit and Run Case : नागपुरात 7 मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला चिरडून कार चालक पळून गेला होता. या अपघातानंतर 3 आठवड्यांनी नागपूर पोलिसांनी कार आणि चालकाचा शोध लावला. मात्र, महिलेला धडक देणाऱ्या या आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. त्यामुळं पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे.
काय घडलं होतं? : नागपूर शहरातील शारदा चौक परिसरात दोन महिला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारनं त्या दोघींना जोरदार धडक दिली. तसंच एका महिलेला कारखाली चिरडून त्या कार चालकानं तेथून पळ काढला. या अपघातात ममता आदम नामक महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. कार चालकानं त्यांना धडक दिल्यामुळं आणि नंतर कारखाली चिरडल्यामुळं ममता यांच्या शरीरातील अनेक हाडं मोडली. त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तरी देखील पुढील सहा महिने त्यांना चालता-फिरता येणार नाही.
अपघाताचा व्हिडिओ व्हायरल : गट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. अपघाताच्या घटनेनंतर काही दिवसांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 3 आठवड्यानंतर आरोपीला शोधून काढलं. मात्र, आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात फार रस दिसत नसल्यानं पोलिसांनी आरोपी कार चालकाला फक्त नोटीस देऊन सोडून दिलं.
पोलिसांचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न ? : नागपूर शहरातील गिट्टीखदान परिसरात 7 मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना एका कारचालकानं उडवलं. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. तर हा अपघाताचा बनाव असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. घटनेच्या तब्बल 22 दिवसानंतर पोलिसांना आरोपी सापडला आणि पोलिसांनी या आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडून दिलं. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणासारखं नागपूर पोलीसही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतात का? असा संतप्त सवाल अनिल देशमुखांनी केला.
नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषीवर कारवाई करावी. तसंच या अपघातामध्ये ज्या दोन महिला गंभीर जखमी झाल्यात, त्यांच्याकडं उपचारासाठी पैसे नसल्यानं त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. या दोन्ही जखमी महिलांवर शासकीय खर्चानं उपचार करावेत, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा -
- पुणे हिट अँड रन प्रकरणात डॉक्टर श्रीहरी हाळनोर, डॉक्टर अजय तावरे, अतुल घटकांबळे यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी - Pune Hit And Run Case Update
- ठाणे नशेच्या विळख्यात! चार महिन्यात 'हिट अँड रन' चे 36 बळी, तर 159 गुन्हे दाखल - Thane Pune Hit And Run Cases
- पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये खासगी व्यक्तींकडून फेरफार, ते चार जण कोण? - Pune Hit And Run Case Update