नाशिक My School Beautiful School Competition : जानेवारी महिन्यापासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या 'माझी शाळा सुंदर शाळा' या स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल लागला असून, यामध्ये नाशिकच्या इस्पॅलिअर हेरिटेज शाळेनं खासगी संवर्गात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या शाळेला 51 लाखांचं बक्षीस जाहीर झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी (5 मार्च) हे बक्षीस दिलं जाणार आहे. तसंच जिल्हा परिषदेच्या दिंडोरी येथील जऊळके या प्राथमिक शाळेला विभागातील प्रथम क्रमांक आणि अ आणि च वर्ग महापालिकेच्या शाळांच्या संवर्गात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या महापालिका शाळा क्रमांक 49 पंचक या शाळेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे.
महिनाभरापासून होत होती तपासणी : इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला केंद्रात प्रथम, नाशिक तालुक्यात प्रथम तसंच जिल्हास्तरावर आणि उत्तर महाराष्ट्रात (विभागीय) प्रथम पारितोषिक मिळाले होते. महिरावणी केंद्र, त्यानंतर तालुका स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत एकूण पाच कमिटी गेल्या एक महिना शाळेत येऊन विविध गोष्टींचा विशेष करुन शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीणविकास कसा होतो, यावर तपासणी करत होते. या स्पर्धेत एकूण शंभर गुणांपैकी इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला 97.5 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. तसंच खासगी शाळांच्या गटातून बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन या शाळेनं दुसरा तर छत्रपती संभाजीनगर येथील भोंडवे पाटील शाळेनं तिसरा क्रमांक पटकावला आहे.
बक्षीसाच्या रक्कमेतून फिरती शाळा सुरु करणार : यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल प्रमुख आणि शिक्षण अभ्यासक सचिन जोशी म्हणाले की, "इस्पॅलिअर स्कूलनं पारंपरिक चौकटीच्या बाहेर जात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. आम्ही या स्पर्धेत मिळणाऱ्या बक्षीसाच्या रक्कमेतून विनियोग जिल्हा परिषदेतील सरकारी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाकरीता फिरती शाळा सुरू करणार आहोत. तसंच सरकारकडून बक्षीस मिळाल्यानंतर बक्षिसाची संपूर्ण रक्कम सरकारी शाळांच्या विकासासाठी वापरणार असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा -