नांदेड Amit Shah Slam MVA : "महाराष्ट्रात उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे नकली पक्ष आहेत. हे तीन नकली पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राचं काय हित करणार," अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. गुरुवारी भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील नरसी इथं अमित शाह यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. "शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे पक्ष अर्धे होते आता दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केलं अशी टीका अमित शाह यांनी केली. तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती या पक्षांवर आली," असंही अमित शाह यांनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्राचा विकास फक्त भाजपाच करू शकते : "महाराष्ट्राचा विकास फक्त भाजपाच करू शकते. केंद्र सरकारनं आतापर्यंत महाराष्ट्राला 7 लाख करोड रुपये निधी दिला आहे. काँग्रेसनं देशात 70 वर्ष सत्ता भोगली. मात्र महाराष्ट्राचा विकास झाला नाही. भाजपानं दहा वर्षात मोठा विकास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी नांदेडमधून महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना साथ द्यावी," असं आवाहन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नरसी येथील जाहीर सभेत बोलताना केलं. महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची जाहीर सभा 11 एप्रिलला नरसी (ता. नायगाव) इथं पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेकांची भाषणं झाली.
देशाच्या विकासासाठी भाजपा सक्षम : "देशाच्या विकासासाठी भाजपा सक्षम आहे. 370 कलम हटवलं. अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रासह देशात समृद्धी महामार्गाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महिलांना उज्ज्वला गॅस, गरीबांना स्वस्त धान्य, गरजूंना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येत आहेत. महाराष्ट्रात समृद्धी मार्ग, नागपूर - गोवा द्रुतगती मार्गाचं काम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्याचं नामकरण करून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविला आहे."
काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही : काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही, हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांनी पाहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील 1 कोटी 16 लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी उपलब्ध करूना दिला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा याचबरोबर शेतीसाठी शासनानं करोडो रुपयाचं अनुदान दिलं आहे.
शरद पवारांनी आतापर्यंत राज्याला काय दिलं : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अनेक विकासकामं सुरू आहेत. मात्र शरद पवार यांनी आतापर्यंत राज्याला काय दिलं, हा प्रश्न सर्वांनी विचारला पाहिजे. राज्यातील नक्षलवादी संपविण्याचं काम केंद्र सरकारच्या मदतीनं केलं आहे. चंद्रपूर भागात आणि राज्यातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात नक्षलवाद निर्माण झाला होता. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्रानं राज्याला पाठबळ दिलं. त्यामुळे या भागात नागरिक निर्भयपणे राहात आहेत. काँग्रेस हा तीन बिघाडी पक्ष बनला आहे. याबिघाडीमध्ये कोणतंच काम नीट होत नाही. राज्यात भाजपा महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील, हे निश्चित आहे. नांदेडमधून महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना सर्वांनी साथ देऊन पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करावेत," असं आवाहनही यावेळी शाह यांनी केलं.
मराठवाड्याचा विकास भाजपानंच केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, "कमळ हे चिखलात फुलणारं आहे. खासदार चिखलीकर हे निश्चितच नांदेडमधून फुलतील, हा आम्हाला विश्वास आहे. मराठवाड्याचा विकास भाजपानंच केला आहे. नांदेडला सर्वाधिक निधी राज्य सरकारनं दिला आहे. यापुढंही निधी कमी पडू देणार नाही. झुकतं माप नांदेडला देण्याचा भाजपाचा मानस आहे. आता दोन शक्ती एकत्र आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे प्रतापरावांची शक्ती दुप्पट झाली आहे. त्यामुळे त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. ते निश्चितच बाजी मारतील यात शंका नाही," असं मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :
- नवनीत राणांनी घेतले केंद्रीय गृहमंत्र्यांचे आशीर्वाद; म्हणाल्या, "भाजपा कार्यकर्ता..." - Navneet Rana met Amit Shah
- जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार- गृहमंत्री अमित शाह यांची माहिती - Amit Shah on AFSPA
- Raj Thackeray Met Amit Shah : राज ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होणार? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास झाली बैठक