मुंबई Bharat Jodo Nyay Yatra : 'भारत जोडो न्याय यात्रे'चा समारोप रविवारी मुंबईत झाला. रविवारी झालेल्या भव्य सभेत इंडिया आघाडीतील देशभरातील 25 पक्षाचे महत्त्वाचे नेते खूप दिवसानंतर एकत्र दिसले. इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर दिल्ली आणि मुंबईतील बैठकीनंतर तिसऱ्यांदाच हे सर्व नेते एकत्र आले. लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या या मोठ्या सभेमुळे याचे फलित इंडिया आघाडीला निवडणुकीत दिसेल का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. मात्र ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रेला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यावरून या यात्रेचा फायदा इंडिया आघाडीला होईल, असं राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. रविवारच्या इंडिया आघाडीच्या सभेमुळं भाजपाच्या गोटातही चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नेमकी काय आहेत कारणे ? पाहूया.
यात्रेचा फायदा इंडिया आघाडीला? : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 14 जानेवारीपासून मणिपुरातून 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात केली. त्याचा समारोप रविवारी मुंबईत झाला. तब्बल दोन महिन्याच्यावर राहुल गांधींनी देशभर प्रवास केला. यावेळी त्यांच्या भारत जोडो यात्रेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. रविवारी झालेल्या समारोप सभेत इंडिया आघाडीतील 25 पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी या सर्व नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारचं धोरण कसं चुकीचं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या सभेला देशभरातून नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेमुळे इंडिया आघाडीतील मरगळ झटकून टाकल्याचं बोललं जात आहे. या सभेचा लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला नक्कीच फायदा होईल आणि मताच्या रुपानं याचे फलित दिसून येईल, असंही राज्यातील महाविकास आघाडीतील नेते बोलत आहेत.
सभेमुळे मरगळ झटकली ? : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला विरोध करण्यासाठी देशभरातील 25 पेक्षा अधिक पक्ष एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर दोन ते तीन बैठका पार पडल्या. मात्र या बैठकानंतर हे 25 पक्षातील देशभरातील नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले नव्हते. इंडिया आघाडीचं सुरुवातीला नेतृत्व करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत 'एकला चलो...रे'चा नारा दिला. त्याचबरोबर बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनीही इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपासोबत जाणं पसंत केलं. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडली. मात्र भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून रविवारी इंडिया आघाडीचे नेते एकत्र आले. त्यामुळे इंडिया आघाडीत पुन्हा एकदा चैतन्य संचारलं असून, जी मरगळ मागील काही महिन्यांपासून इंडिया आघाडीत आली होती. ती मरगळ नेत्यांनी झटकून पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
आघाडीनं भाजपाला गाफिल ठेवले ? : लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तारखा जाहीर झालेल्या असतानाही इंडिया आघाडीत समन्वय नाही किंवा जागा वाटपाबाबत एकवाक्यता नाही, असं चित्र देशभर निर्माण झालं होतं. सत्ताधारी भाजपानं वारंवार इंडिया आघाडीवर टीका करत, इंडिया आघाडीत फूट पडली असं म्हटलं होतं. तसेच इंडिया आघाडी फार काळ टिकणार नाही, असं भाजपानं गृहीत धरलं होतं. मात्र "इंडिया आघाडीतील आम्ही सर्व नेते एकत्रच असून, आम्ही वरवर फुटल्याचं दाखवत असलो तरी, तरी आतून आम्ही सर्वच एकत्र आहोत आणि भाजपाच्या विरोधात आहोत. अशी राजकीय खेळी इंडिया आघाडीने खेळत भाजपाला अंधारात ठेवले. परिणामी भाजपाही इंडिया आघाडीत फूट पडली या अविर्भावात राहिला. मात्र काल झालेल्या सभेनंतर भाजपालाही जाग आली असून, भाजपाचे डोळे उघडले आहेत. इंडिया आघाडीला भाजपाला अंधारात ठेवण्यात यश आले आहे," असा दावा इंडिया आघाडीतील नेत्यांनी केाल आहे.
सभेमुळं भाजपाच्या गोटात चिंता? : "लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना, इंडिया आघाडीची रविवारच्या सभेमुळे भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी '400 पार' चा नारा दिलेला आहे. असं असताना रविवारी 25 पक्षातील नेते एकत्र येऊन इंडिया आघाडी मजबूत असल्याचं दाखवल्यामुळे सत्ताधारी भाजपाचे डोळे विस्फारले आहेत. यामुळं भाजपाच्या गोटात चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले आहेत," असं काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे. "इंडिया आघाडीला लोकांकडून जर एवढा प्रतिसाद मिळत असेल तर आपले 400 पेक्षा अधिक खासदार निवडून येणं कठीण दिसत आहे, असं भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची नक्कीच वाटत आहे," असेही दलवाई यांनी म्हटले आहे.
आम्हाला घाबरण्याचे कारण नाही : इंडिया आघाडीच्या रविवारच्या शिवाजी पार्क येथील सभेनंतर भाजपाच्या गोटात चिंता पसरली आहे का? किंवा भाजपाचे धाबे दणाणले आहेत का? असा प्रश्न भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांना विचारला होता. यावर त्यांनी, "इंडिया आघाडीच्या सभेमुळे आम्हाला घाबरण्याची बिल्कुल गरज नाही, असं गणेश हाके यांनी म्हटलं आहे. 25 पक्ष एकत्र येऊनही शिवाजी पार्क मैदान भरलं नाही. त्यांना शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची अजिबात गरज नव्हती. तर त्यांनी कुठल्यातरी एखाद्या सभागृहात सभा घेतली पाहिजे होती. कारण देशभरातील 25 पक्षाचे 25 महत्त्वाचे नेते येऊनही त्यांना लोकं जमवता येत नसतील, तर यामध्येच त्यांचं अपयश दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाला हरवण्यासाठी त्यांचा आकांडातांडव सुरू आहे. यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण लोकं यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल," असेही गणेश हाके यांनी म्हटले आहे.
आमची धास्ती म्हणून त्यांची पळापळ : "राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो यात्रा चांगल्या प्रकारे काढली. या यात्रेला देशभरातून लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि याचा काल समारोप आपण मुंबईत पाहिला. या समारोप सभेत इंडिया आघाडीतील 25 पक्ष पक्षाचे नेते उपस्थित होते. ही सभा यशस्वी झाल्यामुळे भाजपाचे धाबे दणाणले असून, त्यांच्या गोटात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडिया आघाडीची भीती आणि धास्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे, म्हणून ते देशभर इकडे-तिकडे धावत आहेत. दुसरीकडं आम्ही सर्व देशभरातील पक्ष आणि नेते खुर्चीसाठी एकत्र आलो नसून विचारासाठी एकत्र आलो आहोत. शेवटी विचार आणि लोकशाही टिकली तर देश टिकेल आणि सत्ता टिकेल," असं काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा :
- INDIA Rally Mumbai: "आता मोदी की गॅरंटी चालणार नाही, छोडो भाजपा आणि भाजपापासून मुक्ती असा नारा द्यावा" - शरद पवार
- INDIA Rally Mumbai: 'इंडिया' आघाडीच्या सभेवरुन एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; तर नाना पटोलेंचं शिंदेंना प्रत्युत्तर
- BJP MNS Alliance : राज ठाकरे-अमित ठाकरे दिल्ली दरबारी; भाजपा-मनसेमध्ये बंद दाराआड घडतंल बरंच काही, दक्षिण मुंबईसाठी आग्रही?