मुंबई - रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. कारण दररोज लाखो मुंबईकर रेल्वे लोकलनं प्रवास करतात. दरम्यान, रेल्वे लोकलबाबत मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. रविवारी (8 डिसेंबर) रोजी मुंबईत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11:30 ते दुपारी 3.30 यादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळं रविवारी जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक नक्की वाचा, नाहीतर प्रवासात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक कुठे? : रविवारी माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड असा मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथे धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तसेच माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे गाड्या उशिराने पोहोचतील. याव्यतिरिक्त ठाण्याच्या पुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक कुठे? : हार्बर मार्गावर अप आणि डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रेदरम्यान सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या आणि वांद्रे आणि गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या 11.16 ते दुपारी 4.47 दरम्यान रद्द असतील. दुसरीकडे ब्लॉकच्या कालावधीत पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय. पायाभूत सुविधांच्या देखभाल, सुरक्षिततेसाठी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केलीय.
हेही वाचा