मुंबई Mumbai Road Accident : अचानक एखादी दुर्घटना झाली आणि आईवडील गमवावे लागले की लहान मुलं ही कायमची पोरकी होतात. लहान मुलांना आईवडिलांचा आधार असणं गरजेचं आहे. आईवडील नसले तर लहान मुलांचा आधारच निघून जातो. असंच काहीसं एका 11 वर्षांच्या मुलीसोबत घडलं. एका दुर्दैवी अपघातात या मुलीला तिची आई गमवावी लागली. परंतु त्या नुकसानाची दखल घेत मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातर्फे तिला 1.1 कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आलीय.
नेमकं प्रकरण काय? : रितिका अशोकन या 11 वर्षीय मुलीला रस्ते अपघातात तिची आई गमवावी लागली. रितिकाची आई सीता अशोकन यांच 2015 मध्ये माझगाव येथील एका रस्ते अपघातात निधन झालं होतं. आता नऊ वर्षांनंतर या मुलीला 1.1 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. आता ही मुलगी 11 वर्षांची असून तिला नुकसानभरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडुन देण्यात आले आहेत. रितिकाच्या वडीलांचं आणि आजोबांचं या दाव्याचा निकाल येण्यापूर्वीच निधन झालं. रितिका सध्या तिच्या वृध्द आजीसोबत राहते. रितिकाची आई सीता अशोकन या अपघातावेळी 37 वर्षांच्या होत्या. त्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षिका होत्या. त्यांना दरमहा 60 हजार रुपये उत्पन्न मिळत होते. त्यांना मिळत असलेल्या उत्पन्नाचा या दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी नुकसान भरपाई देताना गांभीर्यानं विचार केलाय. 11 मे 2015 रोजी सीता अशोकन त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना वेगाने जाणाऱ्या ट्रेलरनं त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली होती त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. धडक देणाऱ्या वाहनाचा मालक आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं नुकसान भरपाईची रक्कम रितिकाला द्यावी, असे निर्देश न्यायाधिकरणानं दिले आहेत.
रितिकाची आई कोण होत्या : अपघातात आईला गमावल्यानंतर खटल्याच्या सुनावणी दरम्यान वडील आणि आजोबांनाही गमावलेली रितिका आता तिच्या आजी सोबत राहते. मात्र त्यांच्या घरात कमावती व्यक्ती नसल्यानं त्यांच्याकडं उत्पन्नाचं दुसरं कोणतेही साधन नाही. तिला शाळा व इतर दैनंदिन खर्चासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळं नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम मुदत ठेवीत ठेवण्याऐवजी काही रक्कम तिला वापरण्यासाठी द्यावी, अशी मागणी वकिलांनी केलीय. 2015 ला ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी रितिकाची आई 37 वर्षांची होती. पुढील अनेक वर्षे ती सेवा बजावू शकली असती आणि त्यामध्ये त्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, अपघातामुळं त्यांनी आपलं आयुष्य गमावलं. स्वत: व कुटुंबियांचा दर्जेदार जीवन जगण्याचा हक्क तिने व तिच्या कुटुंबीयांनी गमावला, याकडे न्यायालयाने लक्ष दिलं. जेव्हा या महिलेचा अपघाती मृत्यू झाला, तेव्हा तिचं वय कमी होतं. जर ती जिवंत राहिली असती तर ती बराच काळ नोकरी करू शकली असती. या दरम्यान, तिचं वेतनदेखील वाढलं असतं. पण अपघातात तिचं निधन झालं आणि मुलीला योग्य जीवन जगण्याची संधी मिळाली नाही.
रितिकाला किती रक्कम मिळणार? : रितिकाला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेतून मोठी रक्कम मुदत ठेवीत ठेवण्यात येईल आणि ती जेव्हा 21 वर्षाची होईल त्याच्यानंतर ती या पैशांचा वापर करू शकेल. तोपर्यंत दर तीन महिन्यांच्या व्याजाचे पैसे तिला मिळतील. 2015 पासूनच्या व्याजाच्या रक्कमेपोटी साडेपाच लाख रुपये रितिकाच्या आजीला देण्यात येतील, असं न्यायाधिकरणाने स्पष्ट केलंय.
हेही वाचा
- पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणी तीन सदस्यीय समिती ससूनमध्ये दाखल - Pune Hit And Run Case Updates
- मेळघाटच्या माखला गावात 'इंग्रजांची आमराई', गावाच्या लोकसंख्येहून अधिक आंब्यांची झाडं - Makhala village mangoes
- ऑनलाईन शिक्षणानं लिहिण्याची सवय सुटली, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात विद्यार्थ्यांची हस्ताक्षर कार्यशाळेला पसंती - handwriting calligraphy
- मानवी तस्करी सायबर फ्रॉड प्रकरण : एनआयएची देशभरात छापेमारी, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या - Human Trafficking And Cyber Fraud