मुंबई Sachin Waze News : 2021 मधील अॅंटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे सध्या तळोजा तुरुंगात आहे. सचिन वाजेनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी सुटकेकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज (6 ऑगस्ट) सुनावणी झाली. वाजेतर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा तर सीबीआयतर्फे ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांनी बाजू मांडली.
सुनावणीदरम्यान काय झालं? : वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद करताना माफीचा साक्षीदार तुरुंगात आणि प्रमुख आरोपी मात्र जामिनावर तुरुंगाबाहेर या स्थितीकडं न्यायालयाचं लक्ष वेधलं. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 306 (4) अंतर्गत तुरुंगात राहणं पूर्णपणे अन्यायकारक आहे. वाजे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ सलग तुरुंगात आहे. त्याच्या विरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात वाजे माफीचा साक्षीदार असल्यानं त्याला शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही, अशा परिस्थितीत त्याला तुरुंगात ठेवणं अन्यायकारक असल्याचं पोंडा यांनी युक्तीवाद केला. विशेष सीबीआय कोर्टानं वाजेचा जामीन अर्ज यापूर्वी दोन वेळा फेटाळला आहे.
'या' तारखेला होणार पुढील सुनावणी : न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी माफीच्या साक्षीदारासंदर्भात असलेल्या कायद्यातील तरतुदीकडं लक्ष वेधलं. मात्र, या प्रकरणात वाजेला जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना त्यांनी केली. यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासल्या जात असून संबंधित न्याय निर्णय तपासले जाणार आहेत. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑगस्टला ठेवण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?: ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झाल्यापासून वाजे पोलीस सेवेतून बाहेर होता. मात्र, 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर वाजेला पुन्हा सेवेत घेण्यात आलं. मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी वाजे कार्यरत होता. त्याला क्राईम इंटेलिजन्स युनिटचं प्रमुख पद देण्यात आलं होतं. त्यानंतर अॅंटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात वाजेला अटक करण्यात आली. तेव्हापासून वाजे तुरुंगातच आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. वाजेनं त्यांच्या आरोपांची री ओढली. त्यानंतर सीबीआयला देशमुखांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची माहिती देत सचिन वाजे माफीचा साक्षीदार बनला.
हेही वाचा -