मुंबई Mumbai Fire News : मुंबईत आगीच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. डोंबिवली आणि धारावीतील आगीच्या घटना ताज्या असताना आता मुंबईतील गोवालिया टँक, ताडदेव इथं शुक्रवारी (31 मे) रात्री 9:00 वाजेच्या सुमारास आग लागली. औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामाला भीषण आग लागल्यानं कामगारांची पळापळ झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
जीवितहानी नाही, मात्र वित्तहानी मोठी : मिळालेल्या माहितीनुसार, ताडदेवमधील पठ्ठे बापूराव मार्ग, 249, तालमिकीवाडी इथं शुक्रवारी रात्री एकमजली इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली. प्लास्टिकच्या गोदामाला ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्लास्टिकला आग लागल्यामुळं आगीचा भडका अधिक मोठा झाला. त्यामुळं हवेत आगीचे मोठ-मोठे लोळ दिसत होते. तसंच परिसरात धुरांचे लोटही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं परिसरात अंधार पसरला. दरम्यान, सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत वाढत्या आगीच्या घटना : मागील काही महिन्यांपासून मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील डोंबिवली येथे एका केमिकलच्या कंपनीला मोठी आग लागून कित्येक लोकांचे बळी गेले होते. तसंच धारावीमध्ये दोन दिवसांपूर्वी आग लागून सहाजण गंभीररित्या जखमी झाले. या घटना ताज्या असतानाच आता मुंबईतील ताडदेव येथे एका प्लास्टिकच्या गोदामाला आग लागल्यानं सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
हेही वाचा -