मुंबई Mumbai Cops Arrested Accused : अंधेरी पश्चिम इथल्या दादाभाई नौरोजी (डी एन ) नगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सराईत भामटा पळाला. या भामट्याला गुन्हे शाखा कक्ष 9 च्या पथकानं राजस्थानमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद फायक इसहार हुसैन (वय 30) असं या पोलिसांनी राजस्थानमध्ये बेड्या ठोकलेल्या भामट्याचं नाव आहे. मंगळवारी सकाळी लघुशंकेचं निमित्त करुन त्यानं पोलिसांच्या तावडीतून पळ काढला, अशी माहिती डी एन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंदर यांनी दिली. मात्र बुधवारी गुन्हे शाखेच्या कक्ष 9 नं आरोपीला राजस्थानातून अटक केली.
फसवणुकीच्या गुन्ह्यात भामट्याला केली होती अटक : मोहम्मद फायक इसहार हुसैनला फसवणुकीच्या एका गुन्ह्यात मुंबई गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकानं गेल्या आठवड्यात अटक केली. सोमवारी अंधेरीतील डी एन नगर पोलिसांनी गुन्हे शाखेकडून 2023 च्या फसवणुकीच्या गुन्ह्यात मोहम्मद फायक इसहार हुसैनचा ताबा घेतला. मोहम्मद फायक इसहार हुसैन 2023 च्या फसवणूक गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार होता. त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी भारतीय चलनाच्या बदल्यात स्वस्त दरात डॉलर्स देण्याची ऑफर देऊन लोकांची फसवणूक केली.
लघुशंकेच्या बहाणा करुन काढला पळ : अटक करण्यात आलेल्या मोहम्मद फायक इसहार हुसैननं मंगळवारी लघुशंकेचं कारण सांगून मंगळवारी पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. आरोपी पळून गेल्याचं कळताच पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला. गुन्हे शाखा कक्ष 9च्या पथकानं मोहम्मद फायक इसहार हुसैनचा शोध घेत राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकातून त्याला बुधवारी ताब्यात घेतलं. गुन्हे शाखेचं पथक आरोपीला घेऊन मुंबईकडं रवाना झालं असून गुरुवारी त्याला मुंबईत आणून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलीस ठाण्यातून काढला पळ : डी एन नगर पोलीस ठाण्यामधून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद फायक इसहार हुसैन (वय 30) हा पळून गेल्याची धक्कादायक घटना घडल्यानं पोलिसांती नाचक्की झाली. चक्क पोलीस ठाण्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा मोहम्मद फायक हा आरोपी निसटला. तो कांदिवली परिसरात राहणारा आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 2 नं या त्याला 12 ऑगस्टला अटक केली. त्यानंतर त्याला डी एन नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. दरम्यान मंगळवारी डी एन नगर पोलीस ठाण्यात त्याची चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर त्याला अंधेरीमधील लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार होतं. मात्र दरम्यानच्या काळात त्यानं पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकली आणि पलायन केलं.
हेही वाचा :