मुंबई : गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोस्टल रोड सी पी 4 साऊथ बाँडच्या टनेलमध्ये चारचाकीच्या (MH 01 BU 3544) चालकाचे स्टेेअरिंगवरील नियंत्रण सुटले. चारचाकी क्रॉस पॅसेज-०५ जवळ कोपऱ्याच्या भिंतीला धडकली. सुदैवानं वाहन चालक आणि सह प्रवासी यांना कोणत्याही स्वरुपाची दुखापत झाली नाही.
निष्काळजीपणानं वाहन चालविल्यानं वाहतूक पोलिसांनी वाहन चालकाला 1500 रुपयांचा दंड आकारला. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे किरकोळ अपघात झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. वाहन चालकाकडं लर्निग लाईसन्स आहे. वाहनात चालकाचे वडील होते. ताडदेव वाहतूक पोलिसांनी चारचाकीला टोविंगच्या मदतीने बाहेर काढले. चालकाच्या म्हणण्यानुसार चारचाकीचे स्टेअरिंग सैल झाले होते. अपघात घडला असताना वाहनाचा वेग सुमारे 60 किमी प्रति तास होता, असा चालकाने दावा केला. अपघातात कारचे मोठ्या नुकसान झालेले आढळले.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अपघाताची माहिती- एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह एक्झिटजवळ दक्षिणेकडील बोगद्यात दुपारी 12:37 वाजता अपघात झाला. अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला, असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याच्या माहितीनुसार प्रियदर्शनी पार्क कंटोल रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण सुरू होते. तेव्हा बोगद्याच्या आत काही तरी समस्या असल्याचं दिसून आलं. दुपारी 12 वाजून 42 मिनिटीला एक चारचाकी सीपी-5 जवळ थांबली होती. दुपारी 12 वाजून 43 मिनिटाला इमर्जन्सी कॉल बॉक्समधून एका व्यक्तीनं फोन करून अपघात झाल्याची माहिती दिली. स्थानिक ऑपरेशन मेंटेन्स रुममधील ऑपरेटरनं सीसीटीव्ही फुटेज तपासून वरिष्ठांना सतर्क केले.
दुपारी दीडनंतर वाहतूक सुरळीत - एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार अपघात झाल्याचं पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. परंतु बोगद्याच्या आत मोबाइल नेटवर्क नव्हते. आपत्कालीन यंत्रणा दिसत नव्हती. बीएमसीचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कोस्टल रोडवर दुपारी दीडनंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे बृहन्मुंबई महापालिकेनं म्हटले आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, 12 ते 30 मार्च दरम्यान कोस्टल रोडवरून सुमारे 2.15 लाख वाहनांनी कोस्टल रोडवरून प्रवास केला.
- कोस्टर रोडवरून जाताना जास्तीत जास्त 80 किमी प्रति ताशीची मर्यादा आहे. तर बोगद्यात 60 किमी प्रति ताशीची मर्यादा आहे. वळणावर, एन्ट्री आणि एक्झिटवर प्रति ताशी 40 किमीची मर्यादा आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. मर्यादेपेक्षा वेगानं वाहन चालविल्यास अपघात होण्याची शक्यता असते.
हेही वाचा-