मुंबई Mumbai BEST Bus Transportation : मुंबईकरांच्या आयुष्यात जितकं महत्व रेल्वेला आहे, तितकंच महत्व बेस्ट बसलाही आहे. रेल्वेच्या प्रवासानंतर आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी मुंबईकर हे नेहमी बसचा उपयोग करतात. ही सुविधा कमी दरात आणि सुरक्षित असल्यानं मुंबईकर बेस्ट बसचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाल्यानं मुंबईकरांचे हाल सुरू आहेत.
लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी : बेस्ट बसची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं मुंबईकरांचे हाल होत आहेत. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी मुंबईकरांना एक-एक तास बसची वाट पहावी लागतेय. बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या डिझेल बस होत्या. मात्र, त्यांची मुदत संपल्यानं त्या मोठ्या प्रमाणात भंगारात काढण्यात आल्या आहेत. याला उपाय म्हणून बेस्टच्या वतीनं कंत्राटी बस सुविधा सुरू करण्यात आली. बेस्ट उपक्रमाच्या स्वतःच्या मालकीच्या बसचा ताफा कमी झाल्यामुळं बेस्टला अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी कराव्या लागल्या आहेत. त्यामुळं बसची वाट बघत मुंबईकर घामाघूम होताय.
रवी राजा यांची प्रतिक्रिया : यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, "आज बेस्ट बसची अवस्था दयनीय झालीय. आज घडीला बेस्टकडं स्वतःच्या केवळ 1 हजार 200 बस आहेत. त्यातील 300 बस या मेंटेनन्ससाठी बाजूला काढण्यात आल्या आहेत. त्यामुळं सध्या, बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या केवळ 900 गाड्या वापरात आहेत. बेस्टनं अर्थसंकल्पात 31 मार्च 2024 पर्यंत 6000 बस रस्त्यावर धावतील असं म्हटलं होतं. आजघडीला मुंबईची लोकसंख्या दीड कोटी आहे. या दीड कोटी लोकसंख्येमागं गाड्यांची संख्या मात्र तुलनेनं कमी आहे. त्यामुळं लोकांना बस स्टॉपवर गाड्यांची वाट पाहावी लागत आहे." "तसंच आज बेस्ट प्रशासनावर कोणाचाही वचक नाही. तिथं फक्त केवळ प्रशासकीय कारभार पाहिला जातोय. तिथं बेस्ट समितीदेखील नाही. त्यामुळंच मुंबईकरांना हे हाल सोसावे लागत आहेत, असा आरोप रवी राजा यांनी केलाय.
आजच्या घडीला बेस्टच्या ताफ्यात एकूण 3175 गाड्या आहेत. यातील 1036 गाड्या बेस्ट च्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. तर 2112 गाड्या बेस्टने कंत्राटी पद्धतीने घेतल्या आहेत. बेस्टची दररोजची प्रवासी संख्या 34 लाखांहून अधिक आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात असलेल्या बस मुंबईकरांसाठी अपुऱ्या पडतात. बेस्टचे महासंचालक अनिल डिग्गीकर यांनी मार्च 2024 पर्यंत बेस्टच्या ताब्यात जवळपास 6000 बस असतील असं म्हटलं होतं. आजच्या घडीला एका बसमागे साधारण हजार प्रवासी संख्या असं प्रमाण आहे.
मुंबईकरांची गैरसोय लवकरच दूर होणार : या संदर्भात बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी सुदास सावंत यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की, "बेस्टच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. सध्या दिवसाला 34 ते 35 लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, बेस्ट बसचा ताफा वाढवण्यासाठी आवश्यक अशी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारलादेखील प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यामुळं लवकरच मुंबईकरांची होणारी गैरसोय दूर होईल. मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल अशी आम्हाला आशा आहे."