अमरावती Anil Bonde Criticizes Yashomati Thakur : शासनाच्या 'लाडका भाऊ' योजनेप्रमाणेच 'लाडकी बहीण' योजनेत देखील महिलांना पाच हजार रुपये मिळावेत. तसंच केवळ पंधराशे रुपये देऊन महिलांची सरकारनं बोळवण करू नये, असं म्हणत महिलांनाही जास्त पैसे देण्याची मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. ठाकूर यांच्या वक्तव्यावर आता राज्यसभेचे भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली. "तुम्ही पालकमंत्री असताना महिलांना एक खडकू पण फेकून मारला नाही. मात्र, आता तुमच्या पोटात का गोळा येतोय," असं बोंडे म्हणाले.
महिलांना ठाकूर किती पगार देतात? : "आमदार यशोमती ठाकूर यांच्या घरी भांडी घासायला, स्वयंपाक करणाऱ्या महिलांना देखीली पंधराशे रुपये दर महिन्याला मिळतात की नाही? आपल्या घरात काम करणाऱ्या या महिलांना ठाकूर किती पगार देतात?. सरकारच्या या योजनेमुळं ठाकूर यांच्या घरात काम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. ठाकूर या महिला, बालकल्याण मंत्री असताना त्यांनी राज्यातील आशा वर्कर तसंच अंगणवाडी सेविकांची कुठलीच मदत केली नाही," असा आरोप देखील खासदार बोंडे यांनी केला.
महिलांनी अर्ज करावा : "माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सर्व बहिणींना मिळणार आहे. काही लोकप्रतिनिधी आपले फोटो छापून महिलांकडून अर्ज भरून घेण्याचा दिखावा करत आहेत. महिलांनी केवळ अधिकृतपणे अंगणवाडी सेविकांमार्फतच या योजनेसाठी अर्ज करावा. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता योजनेचा लाभ घ्यावा," असं आवाहन देखील खासदार बोंडे यांनी केलं.
विशाळगड प्रकरणी भाजपा आक्रमक : सध्या विशाळगडचा मुद्दा तापत असल्याचं दिसत आहे. विशाळगड परिसरात अतिक्रमणांनी धुमाकूळ घातला आहे. या मुद्द्यावरून भाजपा आता आक्रमक झाला आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगड परिसरात 158 अतिक्रमणे होती, ही अतिक्रमणं हटवली पाहिजेत. विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी अमरावतीत भाजपा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा खासदार अनिल बोंडे यांनी दिला.
वर्ध्यात 'लव्ह जिहाद'ची दोन प्रकरणे : 'कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगड परिसरात 158 अतिक्रमणे होती, ही अतिक्रमणे हटवली पाहिजेत. गडाचे पावित्र्य राखलं पाहिजे. अमरावतीतही विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी भाजपा रस्त्यावर उतरणार आहे. तसंच वर्ध्यात 'लव्ह जिहाद'ची दोन प्रकरणे समोर आली आहेत. पोलिसांनी अशा प्रकरणांकडं लक्ष द्यावं. एका प्रकरणात आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यासंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच हरवलेल्या मुलींचा तातडीनं शोध घ्यावा. 'लव्ह जिहाद'च्या घटना कट रचून घडवल्या जात आहेत. बडनेराचं 'लव्ह जिहाद'चं जाळं पुलगाव वर्ध्यापर्यंत पोहोचलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी अशा प्रकरणांची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
'हे' वाचलंत का :
- विधानपरिषद क्रॉस वोटिंग प्रकरण; काँग्रेसच्या सात आमदारांवर कारवाई करणं चुकीचं : प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar On Congress
- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले! आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हे शिर्डीत वर्ग करण्याचे न्यायालयाचे निर्देश - Jitendra Awhad News
- विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय - Shivsena UBT