शिर्डी (अहमदनगर) Online Gambling On Mobile : एकेकाळी फक्त संवाद साधण्याचं माध्यम म्हणून उपयोगी असलेला मोबाईल आता चालते फिरते जुगाराचे केंद्र (Online Gambling) बनले आहे. पत्यांचे गेम, बेटीग ॲप यामुळं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना या जुगाराचं व्यसन लागलं आहे. पालकांनी यावर विशेष काळजी घेण्याची गरज असून, यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारनं कडक कायदा करण्याची गरज निर्माण झाली असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलं.
संवाद साधण्यासाठी मोबाईलचा वापर : दिवसेंदिवस मुलांचं मोबाईल पाहाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मोबाईलही ॲडव्हान्स होत चालला आहे. अँड्रॉईड मोबाईल तर अलिबाबाची गुहा बनली आहे. तुमच्याजवळ केवळ इंटरनेट असेल. तर तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट अनुभवू शकता. इतका मोबाईल प्रभावी बनत चालला आहे. नवीन पिढीही यात गुंतत चालली आहे. एक काळ होता. की मोबाईलचा वापर केवळ एकमेकांशी दूरहून संवाद साधण्यासाठी होत होता. जसं तंत्रज्ञान बदललं तसं मोबाईल बदलला. अँड्रॉईड प्रणालीवर चालणारा मोबाईल आला आणि या क्षेत्रात क्रांतीच झाली. त्यात खऱ्या अर्थानं भर पडली ती फोर जी इंटरनेटची. त्यानंतर मोबाईलचा वापर पूर्णपणे बदलून गेला. मोबाईल म्हणजे चालती फिरती बँक, चालते-फिरते थिएटर, गेम पार्लर तसेच मनोरंजनाचे भांडार बनले. सुरुवातीला केवळ अगदी लहान मुलांचे उन्हाळ्याच्या सुटीत वेळ घालविण्यासाठी खेळले जाणारे खेळही ऑनलाईन जुगारासाठी वापरले जाऊ लागले आहेत.
हजारो कोटींची उलाढाल : मनोरंजनाचं माध्यम म्हणून मोबाईलकडं बघितलं जात होतं. काळ बदलला तसं मोबाईलचा वापरही बदलला. यूपीआय आल्यानंतर मोबाईलवरून केवळ नंबरवर पैसे पाठविणं शक्य होऊ लागलं. क्षणात पैसे कुठेही ट्रान्सफर होऊ लागले. याचा फायदा घेतला जुगार गेमिंग ॲप बनविणाऱ्यानी. वर वर साधे वाटत असलेल्या या ऑनलाईन बेटिंग ॲप्सची उलाढाल हजारो कोटींची आहे. यावरून लक्षात येईल की, किती लोक या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनात बुडाले आहेत.
हळूहळू खिशातील पैसे कमी : जुगार खेळण्यासाठी जुगाराच्या अट्ट्यावर जायची गरज नाही. म्हणजे कुणी जुगार खेळत असेल. तर त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही समजणार नाही. अशा परिस्थितीत जुगार खेळण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सुरुवातीला अगदी कमी पैशात जुगार खेळण्याची सोय असल्यामुळं या ॲप्सचं व्यसन अगदी सहज लागते. परंतु नंतर जुगाराच्या आहारी गेल्यावर हळूहळू खिशातील पैसे कमी होऊ शकतात.
कडक कायदा करण्याची गरज : आतापर्यंत आपण जुगार म्हणजे केवळ मटका, लॉटरी, पत्ते, हॉर्स रेसिंग यालाच समजत होतो. परंतु आता या जुगाराचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. या सर्व गोष्टी आता ऑनलाईन आल्या आहेत. किंबहुना त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. या प्रकारावर नियंत्रण मिळवायचं असेल. केंद्र आणि राज्य सरकारनं कडक कायदा करण्याची गरज असल्याचही वैजापूरकर यांनी सांगितलं.
आत्महत्यांचे वाढते प्रमाण : अनेक तरूण तरुणी ऑनलाईन जुगार खेळतात. यात पैसे हरतात. त्यामुळं आर्थिक अडचणीत येतात. परिणामी घर उद्ध्वस्त होते. काही लोक आत्महत्येचाही मार्ग पत्करतात. अशा प्रकारात दिवसेदिवस वाढ होत आहे. अनेक राज्यांनी यासंदर्भात कायदे बनवले असले तरी, काही राज्यांमध्ये अजूनही यासाठी कायदे नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे.
नवीन नावाने ॲप्स सुरू : केंद्र सरकारने आतापर्यंत सहाशेच्यावर ॲप ब्लॉक केले आहेत. त्यात सुमारे 200 बेटिंग म्हणजेच जुगार ॲप्स आहेत. तरीही नाव बदलून किंवा थोडेसे स्वरूप बदलून हे बेटिंग ॲप्स बाजारात येतच आहेत. या ऑपरेटर्सवर जोपर्यंत क्रिमिनल चार्ज लावला जात नाही. तोपर्यंत याला आळा बसणार नाही.
सहज पैशांचा हव्यास : आज-काल सर्वांनाच पटकन आणि सहज श्रीमंत व्हायचं आहे. विशेष करून तरुणांना. कारण तशा प्रकारच्या जाहिराती त्यांच्या समोर येत असून या जाहिरातींवर कोणाचेही बंधन नाही. या प्रवृत्तीमुळं अनेक तरूण या बेटींग ॲप्सच्या आहारी जात असल्याचं समोर आलंय. यामुळं राज्य आणि केंद्र सरकारनं येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवून या संदर्भात कडक कायदा आणला पाहिजे असं मत, सतीश वैजापूरकर यांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा -