मुंबई T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला धुळ चारून इतिहास घडवल्यानंतर आज (4 जुलै) विजयी टीम इंडियाचं भारतात आगमन झालं. विश्वविजेत्या टीम इंडियाच्या 4 मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार व्हावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तसंच यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले प्रताप सरनाईक? : माध्यमांशी संवाद साधत असताना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, " भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात करत टी-20 विश्वचषक जिंकला. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आज भारतीय खेळाडूंचं मुंबईत आगमन होत आहे. तब्बल 13 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्डकप आपण जिंकलो आहोत. याचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. शेवटची मॅच अत्यंत चुरशीची झाली. साऊथ आफ्रिका जिंकणार की भारत? याची क्षणाक्षणाला उत्सुकता वाढत होती. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत वर्ल्डकप जिंकला. या विश्वविजेत्या खेळाडूंचं आज मुंबईत जंगी स्वागत होणार आहे," असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार व्हावा : पुढं बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, "रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे हे चारही खेळाडू मुंबईकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. यामुळं या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सभागृहात सत्कार व्हावा, अशी मागणी मी आज सभागृहात करणार आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या पार्श्वभूमीवर विधिमंडळात गाव-खेड्यातून आमदार आलेत. अनेक लोकं आपल्या कामासाठी येथे आलेत. त्यामुळं मी विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार व्हावा", असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- टीम इंडिया मायदेशी परतली, चाहत्यांकडून जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ - Team India Back To Country
- 'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल; आज मुंबईत निघणार भव्य विजयी मिरवणूक, 'हे' रस्ते असणार बंद! - Team India Victory Rally
- मायदेशात परतल्यावर कसं होणार विश्वविजेत्यांचं स्वागत? 17 वर्षांपूर्वीचा 'तो' क्षण पुन्हा अनुभवता येणार - Team india Prade