पालघर Corona Warriors : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे (Chinchani Gram Panchayat) वरिष्ठ लिपिक जयेश धांगडे (Jayesh Dhangde) यांचं कोरोना काळात निधन झालं होतं. त्यांच्या वारसांना तब्बल तीन वर्षानंतर ५० लाख रुपयांची मदत दिली जाणार असून ही मदत मिळवून देण्यात दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी (Manisha Chaudhary) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, अधिकारी, सफाई कामगार तसंच सरकारच्या विविध खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्यासाठी विमा कवचाचं संरक्षण राज्य सरकारनं दिलं होतं. कोरोनात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मानसिक बळ देण्यासाठी सरकारनं ही घोषणा केली होती.
मदतीसाठी ठोठावले चौधरींचे दार : डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक जयेश धांगडे यांचं कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सात मे २०१९ रोजी विक्रमगड येथील कोरोना सेंटरमध्ये निधन झालं होतं. त्यांच्यामागे आई आणि दोन भाऊ असं कुटुंब आहे. जयेश यांनी सेवेत असताना त्यांच्या मरणोत्तर कुटुंब निवृत्ती वेतन अथवा अन्य लाभांसाठी त्यांच्या आई सविता ललित धांगडे यांना वारस केलं होतं. त्यांनी वारंवार ही मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु त्यांची शासकीय पातळीवर पुरेशी दखल घेतली नाही. त्यामुळं अखेर त्यांनी आमदार मनीषा चौधरी यांचे दार ठोठावले.
चौधरी यांनी कागपत्रांसह केला पाठपुरावा : चौधरी यांनी वेगवेगळे शासन नियम, अध्यादेश यांची पडताळणी करून राज्याच्या ग्रामविकास विभागाशी पत्रव्यवहार केला. मुंबई महानगरपालिका अथवा सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरीला असताना जर या कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादुर्भावामुळं मृत्यू झाला, तर त्याला सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा आधार घेऊन आमदार चौधरी यांनी सविता धांगडे यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत ग्रामविकास अधिकारी, चिंचणीचे सरपंच तसेच अन्य विभागाची कागदपत्रे मिळवून राज्य शासनाकडं पाठपुरावा केला. राज्य सरकारनं पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदांवरील १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा रक्कम देण्यास मान्यता दिली होती.
पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा : याबाबतचा शासन निर्णय २० नोव्हेंबर २०२० रोजी काढण्यात आला होता. या नियमाचा आधार घेऊन आमदार चौधरी यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडं पाठपुरावा केला. कोरोना संक्रमण काळात ग्रामीण भागातील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कोरोनामुळं झालेल्या निधनानंतर त्याच्या वारसांना तातडीनं मदत द्यायला हवी होती. परंतु, ती न दिल्यामुळं आमदार चौधरी यांनी या कर्मचाऱ्याच्या विमा कवचासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर, आता सविता धांगडे यांना पन्नास लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान याबाबत डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी कुटुंबीयांना लवकरच धनादेश देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा -
- Marathwada Mukti Sangram: मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणीत स्वातंत्र्यसैनिक देवलु बाई यांचे अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ
- Vermicompost Production : मेळघाटातील मोथा गावात गांडूळ खत निर्मिती; महिलांना मिळाला आर्थिक संपन्न होण्याचा मार्ग
- Sunil Kawale Suicide Case : आत्महत्याग्रस्त सुनील कावळे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत; मंत्री दीपक केसरकरांची माहिती