बीड Minor Girl Molested In Beed : बीड जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "तू आजारी आहे, तुला तुझ्या मामानं बोलावलंय," असं खोटं सांगून आरोपीनं मुलीला तिच्या वसतिगृहाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं? : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिकत असून शिक्षणासाठी तिला एका वसतिगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, दहिफळ चिंचोली येथील आरोपी सनी उर्फ स्वप्निल पाडळे आणि अमोल अंकुश जाधव हे दोघं पीडितेच्या वसतिगृहाबाहेर आले आणि त्यांनी तिला सांगितलं की, तुझे मामा रुग्णालयात आलेले आहे. तू आजारी असल्यामुळं तुला दवाखान्यात दाखवायचंय. यासाठी मामांनी तुला बोलावलंय. अशी बतावणी करत दोघांनी तिला मोटार सायकलवर बसवलं. त्यानंतर अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या एका लॉजच्या मागील खुल्या जागेत तिला घेऊन गेले. तिथं सनीनं पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीनंच तिला तिच्या मूळगावी नेऊन सोडलं. घाबरलेल्या पीडित मुलीनं आपल्या आई आणि मामाला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर लगेच नातेवाईकांसह त्यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दोघांवर गुन्हा दाखल : या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 515/2024 भा.न्या.सं. 137, 64, 65(1), 3(5) यासह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12, 17 नुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करत आहेत.
हेही वाचा -
- इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात; तरुणीचे नग्न फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी - Beed Rape Case
- इंजेक्शन देऊन बेशुद्ध अवस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 2 वर्षानंतर आरोपीला अटक - Minor Girl Sexual Abuse
- धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून कोयत्यानं वार; सासरा, दीर अन् मामेभावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Thane Gang Rape Case