मुंबई Red Alert In Pune and Satara : भारतीय हवामान खात्यानं पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केलाय. कोयना धरणक्षेत्रात तसंच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरल्यानं या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक, पवनातून 5 हजार क्युसेक, तर चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नदी काठांवरील तसंच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.
महत्त्वाची अपडेट :
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2024
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे.
खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची…
उपमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (3 ऑगस्ट) अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. तसंच पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. कोयना धरणातून सध्या 5 हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरु असल्यानं कृष्णाकाठच्या गावांना तसंच तेथील पुररेषेलगतच्या नागरिकांनीही आवश्यक काळजी घ्यावी, प्रशासनानेही त्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिलेत.
या गावांना सावधानतेचा इशारा : हवामान विभागानं पुढील काही तासांत धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळं धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं दत्तवाडी, येरवडा परिसर, पाटील इस्टेट, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, पिंपरी कॅम्प, कासारवाडी, रावेत, बालेवाडी गावठाण, कपिल मल्हार परिसर, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी, एकता नगर तसंच नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावं असं सरकारनं म्हटलंय.
हेही वाचा -